महिलांच्या मंदिर प्रवेशावरून आंदोलन केल्याने चर्चेत आलेल्या भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या तृप्ती देसाई या शेतकरी प्रश्न आणि महागाईच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्या आहेत. पिंपरी – चिंचवडमध्ये भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू असतानाच प्रवेशद्वाराबाहेर तृप्ती देसाई यांनी तूरडाळ, कांदे आणि दारुच्या रिकाम्या बाटल्या फेकून सरकारचा निषेध नोंदवला. यामुळे तेथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

शेतकरी प्रश्नांवरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. त्यांनी शेतकरी प्रश्नांवरून राज्यातील भाजप सरकारला धारेवर धरले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनीही अनेकदा आंदोलने केली आहेत. शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांनी राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनातही सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे, असा आग्रह विरोधी पक्षांनी धरला होता. राज्याचा अर्थसंकल्प मांडत असताना विरोधी पक्षांच्या आमदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली होती. तसेच गदारोळ केला होता. त्यामुळे सरकारने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या १९ आमदारांना निलंबित केले होते. त्यानंतर विरोधकांनी विधीमंडळ अधिवेशनाच्या कामकाजावर बहिष्कारही घातला होता. विरोधकांनी राज्यभरात शेतकरी कर्जमाफीसाठी संघर्ष यात्राही काढली होती. शेतकरी कर्जमाफीचा तापलेला मुद्दा शांत होतो न होतो तोच आता शेतकरी प्रश्न आणि महागाईच्या मुद्द्यावरून भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या तृप्ती देसाईही आक्रमक झाल्या आहेत. पिंपरी – चिंचवडमध्ये भाजप कार्यकारिणीची बैठक सुरू आहे.

बैठकीसाठी कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. पत्रकारांनाही या बैठकीत प्रवेश देण्यात आलेला नाही. सुरक्षेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी बैठकीच्या ठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अशा वेळी तृप्ती देसाई यांनी बैठकीच्या ठिकाणी प्रवेशद्वारासमोरच आंदोलन केले आहे. त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत प्रवेशद्वारासमोर दारुच्या बाटल्या, तूरडाळ आणि कांदे फेकून सरकारचा निषेध केला. यामुळे तेथील वातावरणात काही काळ तणाव निर्माण झाला होता. आक्रमक झालेल्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि तृप्ती देसाई यांच्यात झटापटही झाल्याचे समजते. तसेच त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.