महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहाराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी पुन्हा एकदा उघडपणे नाराजी व्यक्त करत, मला डावलण्याचा, बाजूला करण्याचा प्रयत्न होतोय. काही जणांना मी पक्षात नकोय. असं बोलून दाखलं. याचबरोबर, मनसेच्या मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेत देखील माझ नाव नाही, असंही त्यांनी सांगितलं.

मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या अध्यक्षतेखाली आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा मेळावा आणि नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या सत्काराचा कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले आहे. मात्र हा मेळावा सुरू झाल्यानंतर वसंत मोरेंची अनुपस्थिती दिसून आल्याने विविध चर्चां रंगू लागल्या होत्या. अखेर मेळावा सुरू झाल्याच्या जवळपास अर्धा तासानंतर वसंत मोरे कार्यक्रमस्थळी दाखल झाले.

यावेळी त्यांना माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारले असता त्यांनी प्रश्नांना उत्तर देताना आपली नाराजी देखील व्यक्त केली आणि मला डावललं जात असल्याचं सांगत आरोपही केला.

…आता मला शहराध्यक्षांचा फोन आला होता –

वसंत मोरे म्हणाले, “मी येणार नव्हतो असं काहीच नाही, मी असं काही बोललोच नव्हतो. मात्र मेळाव्याची जी पत्रिका आहे, त्यात कोअर कमिटीच्या दहा जणांचीच नावे होती आणि मी अकरावा आहे माझं त्यात नाव कुठल्याच कार्यक्रमात नव्हतं. मी रात्री देखील सांगितलं होतं की मला मेळाव्याला यायचं आहे, रात्री उशीरा माझ्याकडे ती कार्यक्रम पत्रिका आली त्यामध्ये वेळापत्रकात माझं नाव नव्हतं. त्यानंतर आता मला शहराध्यक्षांचा फोन आला होता.”
तुम्हाला डावललं जात आहे का? “होय, तसं वारंवार घडतय.मी याबाबत अनिल शिदोरे यांना कळवले आहे. या सगळ्या गोष्टी मला जिथे सांगायच्या तिथे सांगितल्या आहेत.”

राज ठाकरेंसमोर वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू –

आगामी निवडणुकीत पक्षाला याचा फटका बसेल असं वाटत नाही का? यावर त्यांनी शक्यता आहे, असं सांगितलं. तर, आपली पुढची भूमिका काय असणार आहे? “माझी भूमिका सुरुवातीपासूनच पक्षासोबत आहे. मी कुठे पक्षाच्या बाहेर पडलोय? फक्त मला डावलण्याचा, बाजूला करण्याचा प्रयत्न होतोय. काही जणांना मी पक्षामध्ये नकोय. मला डावलून राज ठाकरे यांच्यासमोर वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.”

रोहित पवारांनी वसंत मोरेंच्या कानात नेमकं सांगितल? –

एका कार्यक्रमाच्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे वसंत मोरे यांच्या कानात काहीतरी बोलल्याचं दिसून आलं होतं. यावर बोलताना वसंत मोरेंनी सांगितलं की, “रोहीत पवार मला म्हणाले की, तात्या तुम्ही अतिशय चांगली भूमिका घेतली तुम्ही मनसेत राहिलात. त्यांनी मला ऑफर दिलेली नाही, उलट त्यांनी सांगितल की तुम्ही योग्य वेळी योग्य भूमिका घेतली ते बरोबर केलं.” यावर मी त्यांना म्हणालो की, “मी माझी भूमिकाच बदलली नव्हती, मी अगोदरपासूनच सांगितलं होतं की मनसेत आहे आणि मनसेतच राहील.” अशी माहिती वसंत मोरे यांनी माध्यमांना दिली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्या बाबत भूमिका मांडल्यावर, त्यावेळी प्रथम सुरुवातीला पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी उघडउघड नाराजी व्यक्त केली होती. या नाराजीचा वसंत मोरे यांना देखील फटका बसला असून त्यांना शहराध्यक्ष पदावरून राज ठाकरे यांना काही तासात बाजूला केले. यानंतर शहराध्यक्षपदी साईनाथ बाबर यांची निवड करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत वसंत मोरे काहीसे नाराज दिसत आहेत.