पिंपरी : जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या बीज उत्सवानिमित्त देहूगाव येथे ५ मार्च रोजी मोठ्या प्रमाणावर वारकरी, भाविक व नागरिक दर्शनासाठी येणार आहेत. यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून ४ ते ६ मार्च दरम्यान वाहतुकीत बदल केले आहेत. वाहतूक शाखेचे उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. देहू परिसरात वाढती वस्ती आणि मर्यादित पार्किंग व्यवस्था लक्षात घेता भाविकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा. तसेच, वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन उपायुक्त पाटील यांनी केले आहे. ४ ते ६ मार्च या कालावधीत देहुगाव कमान (जुना मुंबई-पुणे महामार्ग) ते देहूकडे जाणारा मार्ग (सार्वजनिक बसेस व दिंडीतील वाहने वगळून) बंद राहणार आहे.

महिंद्रा सर्कल ते फिजुत्सु कॉर्नर, कॅनबे चौक, आयटी पार्क चौक मार्ग, तळेगाव-चाकण रोडवरील देहुफाटा ते देहूगाव मार्ग, आयटी पार्क, कॅनबे चौक ते काळोखे पाटील चौक, त्रिवेणीनगर चौक (निगडी) ते तळवडे चौक, डायमंड चौक ते देहू मार्ग, १४ टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक, काळोखे पाटील चौक ते देहू मुख्य कमान व परंडवाल चौक, जुना पालखी मार्ग (कंद पाटील चौक ते झेंडेमळा जकात नाका) हा वन-वे करण्यात येणार असून झेंडेमळ्याकडून कंद पाटील चौकाकडे प्रवेशबंदी असणार आहे. त्यासाठी वाहनचालकांनी भक्ती शक्ती चौक, मोईफाटा, एच.पी. चौक, संविधान चौक, कृष्णानगर चौक, कुदळवाडी सर्कल आदी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक रहिवाशांना अंतर्गत रस्त्यांचा वापर करता येणार आहे.

वाहनतळाची विशेष सोय

आळंदी-तळवडे मार्गे येणार्‍या वाहनांसाठी माऊली वजनकाटा, काळोखे पाटील चौक (खंडेलवाल चौक) व गायरान परिसरात पार्किंग व्यवस्था राहणार आहे. याशिवाय, जुना पुणे-मुंबई महामार्गावरील देहू कमान येथून येणार्‍यांसाठी राधाकृष्ण लॉन्स शेजारील सीओडीच्या जागेत पार्किंगची सोय आहे. देहुफाटा मार्गे येणार्‍यांसाठी सप्तपदी लॉन्स, येलवडी शॉपिंग कॉम्प्लेक्स, दिगंबरा डेव्हलपर्स, भगिरथी लॉन्स तसेच साईराज चौक ते देहुफाटा दरम्यानच्या जागांमध्ये पार्किंगची सोय उपलब्ध आहे. संबंधित ठिकाणी पीएमपीएमएल बस पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे.