पुणे : ‘तुकाराम होणे सोपे नाही, त्याचा त्रास आणि वेदना मी जवळून पाहिल्या आहेत,’ असे तुकाराम मुंढे यांचे ज्येष्ठ बंधू आणि महाराष्ट्र पब्लिक स्कूलचे अध्यक्ष अशोक मुंढे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात सांगितले. न्यू ईरा पब्लिकेशन आणि सरहद पुणेच्या वतीने तुकाराम मुंढे यांच्या जीवनावर आधारित ‘तुकाराम’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात अशोक मुंढे बोलत होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, महाराष्ट्र पब्लिक स्कूलचे अध्यक्ष अशोक मुंढे, माजी सनदी अधिकारी संग्राम गायकवाड, ‘सरहद’चे संजय नहार, पुस्तकाचे लेखक शफी पठाण आदी या वेळी उपस्थित होते.
‘परिस्थितीवर मात करून तुकाराम मुंढें यशस्वी’
‘आम्ही शेतकऱ्याच्या घरात जन्मलो. अठराविश्वे दारिद्र्य वाट्याला आले होते. थकलेल्या वडिलांना शेतीसाठी मदत करता येईल म्हणून तुकारामला गावी ठेवायचे की, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याला संभाजीनगरला न्यायचे अशी व्दिधा मनःस्थिती होती. पण, आईला विश्वासात घेतले आणि वडिलांना न सांगता तुकारामला संभाजीनगरला पळवून आणले. पुढे मी उप-जिल्हाधिकारी असताना तुकारामचा आयएएसचा अभ्यास सुरू होता. आता तुकारामचे यश दिसते. मात्र, तुकाराम होणे सोपे नाही. त्याचा त्रास आणि वेदना मी जवळून पाहिल्या आहेत,’ असे अशोक मुंढे यांनी सांगितले.
‘सध्या फार कठीण काळ आहे. कशाबद्दल काहीही वाटू नये, अशी परिस्थिती जगभरात निर्माण झाली आहे. पैसे दिले तर माझे काम होते, मला बाकीचे प्रश्न नाही. अशी फार वाईट परिस्थिती देशात-राज्यात आहे. आपण सांस्कृतिकदृष्ट्या अधम पातळीला पोहोचलेलो आहोत. लोकप्रतिनिधी आरवाच्य भाषा वापरतात. महाराष्ट्र कुठे चालला आहे ? माणसांच्या शब्दांना, सुसंस्कृत असण्याला काही किंमतच उरलेली नाही. राजकारणातील-समाजकारणातील संदर्भाने आपण अत्यंत अवनत अवस्थेला, अत्यंत तळाशी पोहोचलो आहोत. अशा काळात तुकाराम मुंडेंसारखा एक वेगळा, दबावाला न जुमानणारा, कायद्याने वागणारा; पण काहीतरी बदल घडवायचा आहे, असा अधिकारी, असा माणूस आपल्यामध्ये असणे, ही अत्यंत दिलासा देणारी गोष्ट आहे,’ असे रंगनाथ पठारे यांनी सांगितले.
‘स्पर्धा-परिक्षेतील यश अंतिम नाही’
तुकाराम मुंढे म्हणाले,‘स्पर्धा-परीक्षेतील यश किंवा अपयश हे अंतिम नसते. बऱ्याचवेळा प्रेरणादायी भाषणे ऐकून स्पर्धा-परीक्षेच्या तयारी सुरूवात केली जाते. स्पर्धा-परिक्षेत यश मिळणे चांगलेच आहे. स्पर्धा-परीक्षा आणि नागरी सेवा हे चांगले माध्यम आहे. मात्र, ते एकमेव, सर्वोत्कृष्ट नाही. स्पर्धा परीक्षा किंवा पद हे फक्त माध्यम आहे. स्पर्धा-परीक्षेची तयारी करणारे कधीच अपयशी होत नाहीत. मात्र, स्पर्धा दुसऱ्याशी करायची नसते. चांगला माणूस बनण्यासाठी स्वतःशी स्पर्धा करायची असते. त्यामुळे या प्रक्रियेतून शिकून एक चांगला माणूस, समाजातील चांगला घटक झाले पाहिजे. कुटुंबाप्रती-समाजाप्रती असलेली भावना व्यक्त करण्यासाठी आपण उत्तम झालो, तर समाज उच्च पातळीवर जायला जास्त वेळ लागणार नाही. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत.’
