पुणे : ‘निर्यात आणि देशांतर्गत ग्राहकांसाठी वेगवेगळा दर्जा ठेवण्याची मानसिकता योग्य नाही. व्यावसायिक छोटा असो वा मोठा प्रत्येकाने अन्नसुरक्षेचे निकष पाळलेच पाहिजे,’ असे मत अन्न आणि ओैषध प्रशासन विभागाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी व्यक्त केले.

सामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी ‘दि पूना मर्चंट्स चेंबर’कडून रास्त दरात लाडू-चिवडा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाचे उद्घाटन रविवारी तुकाराम मुंढे आणि माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव ईश्वर नहार, सहसचिव आशिष दुगड, माजी अध्यक्ष रायकुमार नहार, राजेश शहा, दीपक बोरा, प्रवीण चोरबेले या वेळी उपस्थित होते.

मुंढे म्हणाले, ‘काही उपक्रमांचा उद्देश चांगला असतो. त्याचा समाजाला फायदा होता. मात्र, उपक्रम राबविताना अन्नसुरक्षाविषयक निकषांचे पालन होणे तितकेच गरजेचे आहे. ‘एफडीए’च्या निकषांचे पालन करणे गरजेचे आहे. पर्यवेक्षकांची नियुक्ती, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, उत्पादन प्रक्रियेवर काटेकोरपणे लक्ष देणे गरजेचे आहे. ग्राहकांना आरोग्यदायी आणि सकस खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी उत्पादन ते विक्री व्यवस्था अशा टप्यांवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कच्चा माल पुरवठादार, दर्जा, उत्पादन प्रक्रिया, विक्रीची नोंद, खाद्यपदार्थांचे वेष्टन, उत्पादनाची तारीख, वापरण्याची अंतिम मुदत या बाबी बारकाईने तपासण्याची गरज आहे. निर्यात आणि देशांतर्गत ग्राहकांसाठी वेगवेगळा दर्जा ठेवण्याची मानसिकता योग्य नाही. व्यावसायिक छोटा असो वा मोठा प्रत्येकाने अन्नसुरक्षेचे निकष पाळलेच पाहिजे.’

‘दिवाळीचा खरा आनंद सामान्यांच्या चेहऱ्यांवर हसू फुलविण्यात आहे. खाद्यपदार्थ स्वस्त असण्याबरोबच चविष्ट आणि उत्तम दर्जाचे असावेत. व्यवहारातील पारदर्शकता, शिस्त आणि सेवाभावी वृत्तीतून सामान्यांशी विश्वासाते नाते जोडले जाते’, असे श्रीनिवास पाटील यांनी सांगितले. राजेंद्र बाठिया यांनी प्रास्ताविक केले. आशिष दुगड यांनी आभारप्रदर्शन केले.

‘विनाकारण त्रास दिल्यास तक्रार करा’

‘अन्नसुरक्षेचे निकषांचे पालन न केल्यास परवाना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. परवाना निलंबनापूर्वी सुधारणा करण्याची संधी द्यावी, अशी व्यावसायिकांची मागणी आहे. मात्र, आरोग्यविषयक निकषांचे पालन न करणे, तसेच आरोग्याला धोका निर्माण झाल्यास तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांकडून विनाकारण त्रास होत असल्यास तपशील, तसेच पुराव्यांसह तक्रार करा. संबंंधितांविरुद्ध कारवाई केली जाईल. आरोप करण्यापूर्वी वस्तुस्थिती पडताळण्याची गरज आहे. ऑनलाइन परवाना प्रक्रिया आणि अधिकृत शुल्काची माहिती व्यावसायिकांनी स्वत: घ्यावी. ग्राहकांनी वेष्टनात दिलेल्या खाद्यपदार्थांची माहिती तपासून द्यावी’, असे मुंढे यांनी सांगितले.

व्यापारी आणि ‘एफडीए’ प्रशासन समन्वयासाठी दरमहा बैठक

‘‘एफडीए’ प्रशासन आणि व्यापाऱ्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी दरमहा व्यापारी प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन करावी’, अशी विनंती चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी केली. त्यानंतर मुंढे यांनी “एफडीए’तील अधिकाऱ्यांनी दरमहा विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींशी भेटून त्यांच्याशी चर्चा करावी, तसेच त्यांच्या अडचणी समजावून घ्याव्यात’, अशी सूचना केली.

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मदतीचे आवाहन

‘पुणे शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अनेक विद्यार्थी वास्तव्यास आहेत. विविध महाविद्यालये, शिक्षण संस्थात दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दुष्काळग्रस्त भागातून शहरात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी सामाजिक दायित्व निधीतून मदत उपलब्ध करुन द्यावी’, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले.