पुणे : ‘‘एमपीएससी’ पेपरफुटीप्रकरणी न्यायालयीन चौकशी समिती नेमण्यात आल्याबाबत मुख्य सचिवांच्या सहीने, राज्य सरकारच्या मंत्र्याच्या हातून पत्र देण्यात आले आहे. आता सारे काही तुकाराम मुंढे यांच्या हातात आहे. त्यांनी अन्नपदार्थांमधील भेसळ शोधून कारवाई केली, त्याप्रमाणे त्यांच्यावर आयोगातील भेसळ शोधण्याची जबाबदारी आहे,’ अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी मांडली.

‘एमपीएससी’चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नवी पेठेतील एस. एम. जोशी पूल येथे ११ दिवस आंदोलन करण्यात आले. न्यायालयीन चौकशीसाठी समितीची नेमणूक, त्या समितीमध्ये तुकाराम मुंढे यांचा सचिवपदी समावेश, चौकशीच्या काळात भीमनवार रजेवर जाणार असल्याचे जाहीर झाल्यावर आंदोलन रविवारी मध्यरात्री थांबवण्यात आले. त्यानंतर पवार यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला.

पवार म्हणाले, ‘‘एमपीएससी’च्या अध्यक्षांना हटवण्यात दोन-तीन महिन्यांचा कालावधी गेला असता, तर परीक्षांना विलंब झाला असता, विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असते. विद्यार्थ्यांना न्याय देणे महत्त्वाचे होते. राजकीय पोळी भाजून घेणे हा उद्देश नव्हता. विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळे आंदोलन यशस्वी झाले. आंदोलनामध्ये विद्यार्थीच होते. अध्यक्षांचा राजीनामा ही विद्यार्थ्यांची मागणी होती. पण, विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजावून सांगितल्यावर ते त्यांना पटले आणि त्यांनी जल्लोष केला. आंदोलनाच्या काळात आम्ही तिथे असल्यामुळे पोलिसांची कारवाई झाली नाही. आमच्यावर पोलिसांचा दबाव होता. ३ हजार पोलीस तैनात होते. पण, एकाही विद्यार्थ्याला हात लावला गेला नाही. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात येईल.’

‘राज्याच्या मुख्य सचिवांच्या सहीने, राज्याच्या मंत्र्यांच्या हस्ते पत्र देण्यात आले. १९५२ च्या कायद्यानुसार चौकशी समिती स्थापन केली आहे. आजी-माजी अध्यक्ष, सर्व आजी-माजी सदस्य यांची चौकशी केली जाणार आहे. केवळ औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी चौकशी होणार नाही, तर अन्य संशयित परीक्षांचाही तपास होणार आहे. तसेच, न्यायालयीन चौकशी समिती अध्यक्षांकडेही तपासाबाबतच्या मागण्यांचे पत्र दिले जाणार आहे,’ असे पवार यांनी सांगितले.

‘गनिमी काव्याने मुंढे यांचे नाव’

‘समितीमध्ये तुकाराम मुंढे यांना अधिकार नाहीत असे कळले, तर सरकारला महागात पडेल. तुकाराम मुंढे यांचे नाव ‘एमपीएससी’संबंधित वर्तुळात कुठेही नव्हते. मात्र, तुकाराम मुंढे यांचे नाव सातत्याने पुढे आणून, त्यांना चौकशी समितीमध्ये घुसवून गनिमी कावा केला आहे. आता मुंढे समितीमध्ये आल्याने तपास योग्य पद्धतीने होईल, दोषींना घरी पाठवले जाईल,’ असे पवार यांनी सांगितले.