पुणे : ‘वाद्यपथकातील वादक अनेकदा तळलेले पदार्थ तसेच ‘एनर्जी ड्रिंक’चे सेवन करतात. हे टाळून सकस आहार घ्यावा. शक्य असल्यास घरचा डबा सोबत न्यावा. परवानाधारक विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थ घ्यावे. गणेशाची भक्ती करताना स्वतःची शक्ती कमी होऊ देऊ नका. दरवर्षी गणेशोत्सवात वाद्यपथकांकडून समाजाला संदेश दिला जातो. यंदा ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र हा संदेश द्या,’ अशी अपेक्षा राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वाद्यपथकांकडून व्यक्त केली. ‘सक्षम महाराष्ट्र घडवायचा असेल तर तो सुरक्षित झाल्याशिवाय बनणार नाही,’ असेही ते म्हणाले.

अभेद्य वाद्यपथक, कलावंत वाद्यपथक, ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र आणि नू. म. वि. प्रशाला यांच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रास्त्यावरील नू. म. वि. प्रशालेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ढोल ताशा महासंघ महाराष्ट्रचे अध्यक्ष पराग ठाकूर, नगरसेवक भारत भूषण बराटे, अभेद्य वाद्य पथकाचे अध्यक्ष रोहन जोशी, सौरभ गुजर, दीपा कुलकर्णी, कलावंत वाद्य पथकाचे सौरभ गोखले, भूषण ताकवले या प्रसंगी उपस्थित होते. या वेळी वादकांनी वादनातून तुकाराम मुंढे यांच्या कार्याला मानवंदना दिली.

मुंढे म्हणाले, ‘गणेशोत्सवात प्रसाद म्हणून पेढे, लाडू आदी पदार्थांचे वाटप केले जाते. मात्र, हा प्रसाद सुरक्षित आहे का, हा प्रश्न विचारण्याची गरज आहे. नागरिकांना सुरक्षित अन्न देणे ही माझी भूमिका असून त्यामध्ये कोणतीही तडजोड होता कामा नये. गणेशोत्सवही याला अपवाद असू शकत नाही. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी अन्नाच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी. अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी करून घ्यावी. गणेशोत्सव मंडळांमध्ये येणाऱ्या प्रत्येक भक्ताला सुरक्षितपणे घरी पाठविण्याची जबाबदारी आपली आहे.’

‘भारताला महासत्ता बनविण्यासाठी केवळ आर्थिक शक्ती पुरेशी नाही. केवळ शारीरिक नव्हे, तर वैचारिक अभेद्यताही निर्माण करणे आवश्यक आहे. आर्थिक, सामाजिक आणि वैचारिकदृष्ट्या सक्षम भारत घडविण्यासाठी प्रत्येकाने आपली भूमिका पार पाडली पाहिजे. यशस्वी होण्यासाठी शिस्त हे सर्वात चांगले हत्यार आहे. ही अत्यंत चांगली गोष्ट वाद्यपथकांमध्ये आहे. कोणत्याही देशाचे भविष्य तरुणाईवर, तरुणाईच्या विचारांवर असते आणि या वाद्यपथकांनी निःस्वार्थपणे सामाजिक कार्य केले आहे, हे वाखाणण्याजोगे आहे,’ असेही मुंढे म्हणाले.