पुणे : स्वस्तात सोन्याचे मणी देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ महिलेकेडील सोन्याचे दागिने आणि रोकड असा ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आल्याची घटना तुळशीबागेत घडली. या प्रकरणी दोन महिलांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत एका ज्येष्ठ महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ महिला धनकवडीतील मोहननगर भागात राहायला आहेत. मंगळवारी (२ जून) सकाळी साडेदहाच्या सुमारास ज्येष्ठ महिला तुळशीबागेतून निघाल्या होत्या. त्या वेळी दोन महिलांनी त्यांना अडवले. स्वस्तात सोन्याचे मणी देण्याचे आमिष त्यांना दाखविले. त्यानंतर दोघींनी ज्येष्ठ महिलेला बोलण्यात गुंतविले. ज्येष्ठ महिलेकडील सोन्याचे मणी आणि रोकड असा ५० हजार ६१० रुपयांचा ऐवज चोरून महिला पसार झाल्या. दागिने आणि रोकड चोरल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.

पसार झालेल्या महिलांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी तुळशीबागेतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस हवालदार खरात तपास करत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून तुळशीबागेत खरेदीसाठी येणाऱ्या महिलांच्या पिशवीतून दागिने, रोकड चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. महिलांकडील ऐवज चोरीला जाण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तुळशीबागेतील व्यापारी, विक्रेत्यांनी तुळशीबागेत पोलिसांनी गस्त वाढवावी, तसेच महापालिका प्रशासनाने या परिसरात अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी केली होती. गेल्या काही महिन्यांत तुळशीबागेत महिलांकडील दागिने चोरीला जाण्याच्या सहा ते सात घटना घडल्या आहेत.

रुग्ण महिलेचे दागिने चोरी

बंडगार्डन रस्त्यावरील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेल्य महिलेचे दागिने चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत एका रुग्ण महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ४० वर्षीय महिला बंडगार्डन रस्त्यावरील एका रुग्णालयात उपचार घेत होती. ३० मे रोजी दुपारी एकच्या सुमारास चोरटा रुग्णालयातील कक्षात आला. त्याने महिलेला प्रसाधनगृहात जाऊन या, असे सांगितले. चोरटा रुग्णालयातील कर्मचारी वाटल्याचे महिलेला वाटले. त्यानंतर महिला प्रसाधनगृहात गेली. चोरट्याने रुग्ण महिलेच्या पिशवीत ठेवलेले १६ हजार ५०० रुपयांची सोन्याची कर्णफुले चोरून नेली. महिला प्रसाधनगृहातून आल्यानंतर काही वेळाने पिशवीची तपासणी केली. तेव्हा पिशवीतील दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके यांनी रुग्णालयास भेट दिली. रुग्णालयात तपासणी, तसेच नावनोंदणी करुन प्रवेश देण्यात येतो. पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पोलीस हवालदार पवार तपास करत आहेत.