पुणे : थंडावा देणाऱ्या कलिंगड, खरबूज, संत्री, मोसंबी अशा रसाळ फळांच्या मागणीत उन्हाळ्यात वाढ होते. यंदाही तुर्कीतील पिवळीधमक आणि आकाराने छोटी असलेली संत्री आता बाजारात दाखल झाली आहेत. पुणे, मुंबईतील फळबाजारातील विक्रेत्यांनी आकर्षक पद्धतीने मांडलेली ही संत्री लक्ष वेधून घेत आहेत.
मार्केट यार्डातील फळबाजारात प्लास्टिक जाळ्यांमधून (क्रेट) मिनी संत्री बाजारात विक्रीस पाठविली जात आहेत. दररोज १५ हजार क्रेट एवढी आवक सध्या बाजारात होते. घाऊक बाजारात एक किलो संत्र्याचे दर प्रतवारीनुसार १६० ते २२० रुपयांपर्यंत आहेत. किरकोळ बाजारात मिनी संत्र्यांची विक्री २५० ते ३०० रुपये किलो दराने केली जात आहे.
‘हवामान बदलामुळे फळांच्या लागवडीत घट झाली आहे. मागणीच्या तुलनेत रसाळ फळांचा पुरवठा कमी प्रमाणावर होत आहे. संत्री तुर्कीहून बोटीने मुंबईतील बाजारात येतात. तेथून पुणे, मुंबई, ठाण्यातील बाजारपेठेत विक्रीस पाठविली जातात. तुर्कीतील थंडी, तसेच गारपिटीमुळे मिनी संत्र्यांच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. लागवडीत यंदा घट झाली आहे. सध्या बाजारात स्थानिक संत्र्यांची आवक कमी प्रमाणावर होत आहे. त्यामुळे तुर्कीतील संत्र्यांच्या मागणीत वाढ झाली,’ अशी माहिती फळ व्यापारी अरफाक बागवान यांनी दिली.
शीतगृहात साठवणूक
‘तुर्कीतील संत्र्यांची साठवणूक शीतगृहात केली जाते. ही संत्री आकाराने छोटी असून, गोडसर, तसेच टिकाऊ आहेत. साधारणपणे तीन महिने ही संत्री टिकतात,’ असे फळ व्यापारी अरफाक बागवान यांनी सांगितले.
