scorecardresearch

हळद यंदा चमकली… ; सांगलीतील उलाढाल १९२ कोटी रुपयांनी अधिक

सांगली परिसरात आलेला महापूर आणि करोनाच्या तडाख्यातून सावरून सांगलीतील हळद बाजाराने पुन्हा गती घेतली आहे. हळदीची उलाढाल तब्बल १९२ कोटी रुपयांनी वाढली आहे.

पुणे : सांगली परिसरात आलेला महापूर आणि करोनाच्या तडाख्यातून सावरून सांगलीतील हळद बाजाराने पुन्हा गती घेतली आहे. हळदीची उलाढाल तब्बल १९२ कोटी रुपयांनी वाढली आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०२०-२१ मध्ये हळदीची उलाढाल १७०७ कोटी १४ लाख ३ हजार ८६० रुपये इतकी झाली होती. चालू वर्षात हळदीची उलाढाल १९२ कोटी ३५ लाख ६३ हजार रुपयांनी वाढली आहे, अशी माहिती बाजार समितीतून देण्यात आली.
२०२० च्या मार्च महिन्यात देशभरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे सर्व बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. परिणामी हळदीच्या ऐन हंगामात बाजार समित्या बंद असल्याने शेतकऱ्यांना हळदीसह अन्य शेतीमाल विक्रीस अडचणी निर्माण झाल्या होत्या. परिणामी बाजार समितीतील आवक घटली होती. वाहतुकीवर मर्यादा असल्याने शेतीमालाची आवक फारशी होत नव्हती. गतवर्षी जिल्ह्यात आलेला महापूर आणि हळद उत्पादन घेणाऱ्या राज्यात देखील अतिपाऊस झाला. त्यामुळे हळदीच्या उत्पादनात घट होईल, असा अंदाज वर्तवला होता.
मात्र, अतिवृष्टी आणि महापुरामुळे हळदीच्या उत्पादनात फारशी घट झाली नाही, असे हळद उद्योगातील जाणकारांनी सांगितले.
करोना काळात हळद औषध म्हणून वापर होऊ लागल्याने हळदीच्या मागणीत वाढ झाली. २०२०-२१ मध्ये राजापुरी आणि अन्य राज्यातील हळदीची १७०७ कोटी १२ लाख ४ हजार ८६० रपये इतकी उलाढाल झाली तर २१-२२ मध्ये १८९९ कोटी ४७ लाख ६७ हजार ६६५ रुपये उलाढाल झाली, अर्थात २०-२१ च्या तुलनेत २१-२२ मध्ये १९२ कोटी ३५ लाख ६३ हजार रुपयांनी उलाढाल वाढली आहे.
थोडी माहिती…
आजही तमिळनाडू वगळता देशभरातून हळदीची आवक सांगलीत होते. देशात एकूण ८० लाख पोती (एक पोते ५५ किलोचे) हळदीचे उत्पादन होते. महाराष्ट्रात जवळपास तीस लाख पोते हळदीचे उत्पादन होते.
उत्पादन वाढल्यामुळे….
युरोपातील देशांमध्ये हळद पूड आणि अखंड हळदीची निर्यात होते. सध्या हळदीचे दर सरासरी सहा हजार ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. हळदीचे उत्पादन वाढल्यामुळे हळद दरावर दबाव निर्माण झाल्याचे हळदीचे व्यापारी, सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष मनोहर सारडा यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Turmeric shines year turnover sangli increased crore corona flood amy

ताज्या बातम्या