पुणे : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकाबाबतीत कौतुक करावेसे वाटते. त्यांनी त्यांच्या सगळ्या विरोधकांना मार्गदर्शन मंडळात टाकले आहे. त्याचप्रमाणे आता देशातील युवकांनीही ज्येष्ठ मंडळींना मार्गदर्शन मंडळात टाकायला हवे. जेन-झी आंदोलनासारखे रस्त्यावर येत सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत. या नव्या मार्गावर युवकांनी कायम राहायला हवे,’ असा सल्ला महात्मा गांधी यांचे पणतू, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांनी पुण्यातील कार्यक्रमात युवकांना दिला.

‘जेन झीच्या आंदोलनाचे नेतृत्व तेच करत आहेत, की जेन-झीला केवळ पुढे केले जात आहे, हा प्रश्न आहे. पण जेन झी नेतृत्व करत आहेत हेच खरे असावे, हीच माझी इच्छा आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.

सिटिझन्स फॉर डेमोक्रॉसी या संघटनेच्या वतीने आयोजित ‘यूथ फॉर डेमोक्रॉसी’ या संमेलनात गांधी बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आशिष कोठारी, संघटनेचे अध्यक्ष आनंद कुमार, महासचिव शशी शेखर सिंग, कोषाध्यक्ष दीपक धोलकिया, समन्वयक अविनाश पाटील या वेळी उपस्थित होते.

‘शेतकरी आंदोलन करत आहेत, तर तो त्यांचा प्रश्न आहे. या मानसिकतेमुळे स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशाचे मोठे नुकसान झाले. हीच मानसिकता स्वातंत्र्यापूर्वीही असती, तर महात्मा गांधीही देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकले नसते. सगळा देश एकवटला, म्हणूनच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. आता आपण सर्वजण मतभेद विसरून रस्त्यावर उतरलो नाही, तर गुलाम बनू,’ असेही गांधी यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘आतापर्यंत देशात सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात अनेक आंदोलने झाली. स्वातंत्र्योत्तर काळात सातत्याने आंदोलने होत होती. त्यांना काही प्रमाणात यशही मिळत होते. मात्र, गेल्या १२ वर्षांत लोकांना गृहीत धरण्याचे प्रमाण वाढले. वेगवेगळ्या प्रश्नांसाठी उभ्या राहिलेल्या आंदोलनांकडे कानाडोळा करण्यात आला. अनुल्लेखाने ही आंदोलने संपविण्यात आली. पण, काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या जंतरमंतरवर देशातल्या युवकांनी आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सगळा देश एकवटला. त्यामुळे मग्रूर केंद्र सरकारलाही नमते घ्यावे लागले.’

‘माझी मुलगी, कस्तुरी जंतरमंतरवर गेली. तीन दिवस तिथे राहिली. जंतरमंतरवर कॉक्रोच जनता पक्षाचे आणि ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनचे एक व्यासपीठ होते. पण, सगळ्या जंतरमंतरवर देशातील तरुण मुले-मुली एकवटले. ते आपल्या मनातील खदखद व्यक्त करत होते. या सगळ्या तरुणांनी, जेन झीने केलेले आंदोलन म्हणजे, एक क्रांतीच होती. अशाच प्रकारच्या आंदोलनांचा मार्ग आपण स्वीकारला पाहिजे,’ असे आवाहनही गांधी यांनी केले.

‘देशात नावापुरती लोकशाही’

‘आपल्या लोकशाहीत लोकांचा सहभाग नाही. केवळ नावापुरती लोकशाही व्यवस्था आहे. हेच गेल्या ८० वर्षांपासून होत आहे. मतदान करण्याशिवाय आपण लोकशाहीत कोणते योगदान देतो? निर्णयप्रक्रियेत लोकांचा सहभाग असतो का? तो नसल्यामुळेच संसदेत अनेक महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या, कायदे केवळ अधिसूचनेद्वारे संमत केल्या जात आहेत. पाच वर्षांपूर्वीचे लोकमत गृहीत धरून कायदे संमत केले जातात. आता तर या मतदानाचेही महत्त्व राहिलेले नाही. आपल्या मतांवर निवडून आलेले लोकप्रतिनिधी विकले जात आहेत आणि नागरिक म्हणून आपण काहीही करू शकत नाही,’ अशी खंत महात्मा गांधी यांचे पणतू, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांनी व्यक्त केले.