शाखा बदलून मिळणे, पालकांची बदली अशा विविध कारणास्तव विद्यार्थ्यांकडून बारावीत महाविद्यालय बदलून देण्याची मागणी केली जाते. मात्र विद्यार्थ्यांच्या महाविद्यालय बदलाच्या कारणांची खात्री करून महाविद्यालयाला मंजूर जागांच्या मर्यादेत आणि जागा उपलब्ध असल्यास गुणवत्तेनुसार संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे निर्देश विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत.

ऑनलाइन प्रवेश पद्धतीअंतर्गत अकरावीला महाविद्यालय निश्चित झाल्यानंतर विद्यालयांकडून बारावीला महाविद्यालय बदलाची मागणी करण्यात येते. त्यासाठी महाविद्यालय घरापासून दूर असणे, पालकांची बदली, वैद्यकीय कारणास्तव, शाखा बदल, शिक्षण मंडळ बदलणे अशी कारणे विद्यार्थ्यांकडूुन दिली जातात. या संदर्भात २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून कनिष्ठ महाविद्यालयाला मंजूर जागांच्या मर्यादेमध्ये व जागा उपलब्ध असण्याच्या अटीनुसार, बारावीसाठी विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय बदलून देण्याची कार्यवाही कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय बदलण्याच्या कारणांची खातरजमा महाविद्यालयांनी करावी. मंजूर जागांच्या मर्यादेमध्ये आणि जागा उपलब्ध असल्यास गुणवत्तेनुसार संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावेत.

कनिष्ठ महाविद्यालय बदलण्याची कारणे आणि गुणवत्ता यांचे काटेकोर पालन करण्यात यावे. या प्रक्रियेत कोणतीही अनियमितता होणार नाही, याची दक्षता पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये, उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी घेण्याबाबत पुणे विभागीय उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालय बदलल्यानंतर ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या माहितीकोषामध्ये (डेटाबेस) आवश्यक त्या सुधारणा करून घेण्याची कार्यवाही संबंधित महाविद्यालयांनी करणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.