पुणे : पुणे जिल्हा परिषद शाळांमधील ग्रामीण भागांतील २५ गुणवंत विद्यार्थ्यांची १० दिवसांच्या अमेरिकेतील शैक्षणिक दौऱ्यासाठी निवड झाली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विद्यार्थ्यांच्या चमूला प्रवासासाठी शुभेच्छा देत दौऱ्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवाद कौशल्य विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू तसेच शिक्षक व पालक उपस्थित होते.

यावेळी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, अमेरिकेतील नासा येथे भेट देण्याची ही खूप मोठी संधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळाली असून ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.अमेरिकेतील शिस्त आणि शिष्टाचाराचे अत्यंत काटेकोरपणे पालन करा, अनोळख्या वस्तूला हात लावू नका, एकमेकांना मदत करा, सर्वांनी एक संघ रहा, शिक्षकांच्या सूचनांचे पालन करा, तब्येतीची काळजी घ्या अशा सूचना दिल्या. देशाला बळकट करण्यासाठी अभ्यास दौऱ्याचा उपयोग करा असे सांगून वारंवार विदेश दौरे करायला मिळावेत, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

या शैक्षणिक दौऱ्यात विद्यार्थी नासा केनेडी स्पेस सेंटर, स्मिथसोनियन नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियम, नासा अर्थ इन्फॉर्मेशन सेंटर, तसेच सॅन फ्रान्सिस्कोमधील प्रमुख तंत्रज्ञान कंपन्या यांना भेट देणार आहेत. शिष्टमंडळ १५ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे मुंबई येथून प्रस्थान करणार आहे. या दौऱ्यात इयत्ता ६ वी व ७ वी मधील ९ मुली व १६ मुलांचा समावेश असून त्यांच्यासमवेत आयुकाचे शास्त्रज्ञ समीर दुर्डे, शिक्षिका माया लंघे (हवेली), प्रमिला जोरी (आंबेगाव), सुनीता खलाटे (बारामती), तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला साळुंके (दौंड) यांचा समावेश आहे.तर या प्रकल्पाची अंमलबजावणी आयुकाच्या सहकार्याने करण्यात येत आहे. या उपक्रमाला ग्रामीण विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, १७,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. निवड प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये काटेकोरपणे पूर्ण करण्यात आली.

नासाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयुकाने विशेष तयारी वर्गांचे आयोजन केले, ज्यामध्ये वैज्ञानिक विषय, आंतरराष्ट्रीय संशोधन पद्धती आणि अवकाश विज्ञान संकल्पना यांची ओळख करून देण्यात आली. तसेच, आयुकाने शिक्षकांसाठीही प्रशिक्षणकार्यक्रम घेतले असून, त्याद्वारे शिक्षकांना अन्वेषण-आधारित शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वर्गात प्रभावीपणे आणण्याच्या पद्धती शिकविण्यात आल्या आहेत.