पिंपरी : बनावट नोटा वापरून फसवणूक करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली. ही घटना हिंजवडीतील मेझा चौक येथे घडली.
चेतन गजानन इंगळे (वय २६, रा. हिंजवडी) आणि आकाश गजानन दांडगे (वय २८, रा. शिंदेवस्ती, मारुंजी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत प्रशांत पांडुरंग आढाव (वय २९, रा. बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ५०० रुपयांच्या बंडलमध्ये वर आणि खाली खऱ्या नोटा ठेवल्या होत्या. आतमध्ये बनावट नोटा ठेवून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. सहायक पोलीस निरीक्षक पांचाळ तपास करीत आहेत.
बनावट नोटांचा भरणा
दरम्यान, निगडी येथील एका बँकेत पाचशे रुपयांच्या सहा बनावट नोटांचा भरणा केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना ३० जून रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली. शिरीष देशमुख (वय ४१, रा. रावेत) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने निगडी गावठाणातील एका सराफी पेढीतील दैनंदिन व्यवहारात जमा झालेली चार लाखांची रक्कम बँकेत भरली. त्यामध्ये ५०० रुपयांच्या सहा नोटा बनावट आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.