नव-वर्षाच्या आगमनाला काहीच दिवस शिल्लक राहिले असून त्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी नववर्षाच्या स्वागताची आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. हे लक्षात घेता मुंबई, पुणे, गोवा आणि बंगळुरु या विविध ठिकाणी तब्बल ३४ किलो चरस व अंमली पदार्थाची विक्री केली जाणार होती. त्या पूर्वीच पुण्यात लोहमार्ग पोलिसांनी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या अंमली पदार्थाची बाजारात १ कोटी रुपये किंमत असल्याची माहिती समोर आली आहे. ललित कुमार दयानंद शर्मा (वय-४९, राहणार हिमाचल प्रदेश) कौलसिंग रूपसिंग सिंग (वय ४० रा. हिमाचल प्रदेश) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात नववर्षाच्या निमित्ताने अंमली पदार्थांची विक्रीसाठी पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील वाडिया ब्रिज खाली येणार असल्याची माहिती शनिवारी मिळाली. त्यानुसार त्याच रात्री सापळा रचून ब्रीज खाली आलेल्या ललित कुमार दयानंद शर्मा आणि कौलसिंग रूपसिंग सिंग या दोघांना ताब्यात घेतले. त्या दोघांची झडती घेतल्यावर तब्बल ३४ किलो चरस अंमली पदार्थ आढळून आला. त्या पदार्थाची आजच्या घडीला १ कोटी ३ लाख ६४ हजार ३०० रुपये इतकी किंमत असल्याचे स्पष्ट झाले. तर ३४ किलो चरस पैकी २२ किलो मुंबई, पाच किलो गोवा, पाच किलो बंगळुरु आणि २ किलो पुणे या ठिकाणी विक्रीसाठी आणला गेला होता. पुण्यात देखील या अंमली पदार्थाची विक्री केली जाणार होती. त्यामुळे आता या निगडित असलेल्या व्यक्तीचा पथकाच्या माध्यमातून शोध घेतला जात असल्याचे सांगण्यात आले.