जीवे मारण्याची धमकी देत एक लाखाची खंडणी मागणाऱ्या दोघांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या एका साथीदाराचा शोध सुरू आहे.
शाहिद अख्तर शेख (वय २५, रा. यमुनानगर, निगडी) आणि अन्वर हसन मुलाणी (वय ३७, रा. रावेत गाव, ता. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जुबेर जब्बार शेख (वय ३१, रा. चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुबेर यांचा बुक बाइंडिंगचा व्यवसाय आहे. गेल्या बुधवारी स्कोडा मोटारीतून आरोपी आले. त्यांनी जुबेर यांना ‘तुला जीवे मारण्यासाठी समोरच्यांकडून अडीच लाख रुपये मिळाले आहेत. तुझा व्यवसाय बंद करून आमच्या नावाने व्यवसाय चालू करून पैसे आम्हाला दे,’ अशी धमकी दिली. मुलाणी याने जुबेरच्या पोटाला चाकू लावून एक लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी पन्नास हजार रुपये घेतले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी अधिक तपास करत आहेत.