पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण परिसरात घरफोड्या करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना गुन्हे शाखा युनिट ४ ने बेड्या ठोकल्या असून त्यांच्या टोळीतील आणखी चार सदस्य फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपींकडून २२ तोळे सोन्याचे दागिन्यांसह १८ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपी हे चोरी केलेल्या पैशांमधून महागड्या स्पोर्ट बाईक आणि कपडे घेत होते, असं तपासात समोर आले आहे. एकाच रात्रीत ते पाच ते सहा घरफोड्या करत. 

साहिल रमेश नानावत आणि देवदास उर्फ दास रमेश नानावत, अशी अटक केलेल्या भावांची नाव आहेत. त्याचबरोबर घरफोड्यातील सोन्याचे दागिने विकत घेणाऱ्या सोनाराला बेड्या ठोकल्या आहेत. योगेश नूर सिंह अस सोनाराचे नाव आहे. सुरदेव नानावत, ध्यान केसरीया राजपूत, अजय सरजा नानावत, राम बिरावत अशी फरार आरोपींची नावे आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण परिसरात घरफोड्या करणाऱ्या टोळीतील सख्ख्या भावांना बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखा युनिट चार ला यश आले आहे. दोन्ही सख्खे भाऊ इतर चार जणांच्या साथीने दिवसा टेहळणी करत आणि रात्री कटावणीने कुलूप तोडून कुलूप बंद घरांमध्ये प्रवेश करत. अन चोरी करायचे. त्यांच्याकडून आत्तापर्यंत २२ तोळे सोन्याचे दागिन्यांसह १८ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

दरम्यान, टोळीतील दोन्ही भावांच्या मागावर गुन्हे शाखा युनिट ४ चे अधिकारी होते. ते कामशेत परिसरात त्यांच्या नातेवाईकांडे असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार त्या ठिकाणी सापळा रचून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आरोपीनी पिंपरी-चिंचवड परिसरात २९, पुणे ग्रामीण परिसरात १९ असे एकूण – ४८ घरफोड्या केल्या असल्याचं उघड झाल्या आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, सिद्धनाथ बाबर, धर्मराज आवटे यांच्या पथकाने केली आहे.