पुणे : नाना पेठेत विजेच्या धक्क्याने शाळकरी मुलीच्या मृत्यू प्रकरणात आंदेकर टोळीतील सराइत शिवम आंदेकरसह साथीदारांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फलकासाठी घेतलेला बेकायदा वीजजोड, तसेच शाळकरी मुलीच्या मृत्यू प्रकरणात आंदेकरविरुद्ध समर्थ पोलिसांनी कारवाई केली. मासे विक्रेत्याला धमकावून खंडणी मागितल्याप्रकरणी शिवम आंदेकरसह साथीदारांविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नाना पेठेतील डोके तालीम चौकात गेल्या आठवड्यात फलकाच्या खांबात उतरलेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने सायली डंबे (वय ८) हिचा मृत्यू झाला होता. या घटनेत एक मुलगा जखमी झाला होता. सुरुवातीला याप्रकरणात समर्थ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. डोके तालीम चौकात लोखंडी फलक लावण्यात आला आहे. या फलकात दिवे लावले होते. हा फलक लावण्यासाठी महापालिकेची परवानगी घेण्यात आली नव्हती. जवळच असलेल्या महावितरणच्या खांबातून बेकायदा वीजजोड घेऊन तेथे दिवे लावण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले.
घटनेच्या दिवशी विद्युत प्रवाह फलक उभा करण्यासाठी लावलेल्या खांबात उतरला. त्या वेळी सायली डंबे तेथे खेळत होती. तिचा हात खांबाला लागल्याने विजेच्या धक्क्याने तिचा मृत्यू झाला. या फलकासाठी बेकायदा वीजजोड घेण्यात आला होता. तसेच, फलकातील खांबात विद्युत प्रवाह उतरल्याने सायलीचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला, अशी माहिती समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिली.
वीज चोरी प्रकरणात स्वतंत्र गुन्हा
महावितरणच्या खांबावरून बेकायदा वीजजोड घेतल्याप्रकरणी शिवम आंदेकर याच्यासह साथीदारांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणकडून देण्यात आलेल्या तक्रारीनुसार भारतीय विद्युत कायदा कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.