बाणेर रस्ता परिसरात एका भीषण अपघातात एका चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावरून अपघाताच्या भीषणतेची स्पष्टपणे कल्पना येते. दोन्ही मुलं आणि त्यांची आई डी मार्टमधील खरेदी संपवून घरी जात असताना हा अपघात घडला. बाणेर रोडवरील दुभाजकावर हे सर्वजण उभे होते. त्याचवेळी भरधाव वेगात आलेली एक कार थेट दुभाजकावर चढली आणि त्याखाली हे सर्वजण चिरडले गेले. या अपघातात एका चिमुरड्याचा मृत्यू झाला असून अन्य चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,डी मार्टमधून खरेदी करून  आल्यानंतर रस्ता ओलांडताना बाणेर  येथील मुख्य रस्त्याच्या दुभाजकावर साजीद आणि निशा शेख, पूजा आणि ईशा विश्वकर्मा हे देखील उभे होते.या दरम्यान, अचानक पुणे विद्यापीठाकडून बालेवाडीच्या दिशेने वेगात जाणाया एका कारने रस्ता दुभाजकावर उभा असलेल्या सर्वाना जोरदार धडक दिली.या घटनेत पूजा आणि ईशा विश्वकर्मासह इतरांना चिरडले.ईशा अजयकुमार विश्वकर्मा अडीच वर्षाच्या चिमुरडीचा जागीच मृत्यु झाला.तसेच तिची आई पुजा विश्वकर्मा तसेच साजीद शेख (४) , सय्यद अली आणि निशा शेख (सर्व रा. बाणेर गावठाण) हे अपघातात जखमी झाले आहेत. याप्रकरणी कारचालक सुजाता सराफ या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा आधिक तपास करण्यात येत आहे.