पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेले तौत्के चक्रीवादळ तीव्र स्वरूप धारण करीत गुजरातच्या दिशेने निघाले असून, येत्या दोन दिवसांत ते त्याच्या वाटेवर असलेल्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीला जोरदार तडाखा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तौत्के चक्रीवादळ शनिवारी केरळजवळून पुढे सरकल्यानंतर दक्षिण कोकणातल्या काही भागांत पाऊस कोसळू लागला आहे. १६ आणि १७ मे रोजी हे वादळ कोकण किनारपट्टीला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे. वेगवान वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

तौत्के चक्रीवादळ शनिवारी पूर्व-मध्य आणि लगतच्या दक्षिण-पूर्व अरबी समुद्रावर घोंगावत होते. केरळपासून ते जवळ होते. त्यामुळे या भागासह कर्नाटक किनारपट्टीवर जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळला. केरळपासून आता ते पुढे सरकत असून, गोवा आणि कोकण किनारपट्टीला समांतर पुढे जाणार आहे. गोव्यातही सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे पश्चिाम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली तसेच पुणे जिल्ह्याच्या काही भागांना त्याची झळ बसेल. या जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

चक्रीवादळ शनिवारी संध्याकाळी गोव्यापासून २२० किलोमीटरवर होते. सध्या ताशी ३० ते ४० किलोमीटरने ते संभाव्य मार्गाने गुजरातच्या दिशेने उत्तर-पश्चिाम पुढे जात आहे. मुंबईपासून ते सुमारे ८०० किलोमीटर अंतरावर आहे. पुढील दोन दिवस कोकणात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे. समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग, रत्नागिरीला सर्वाधिक तडाखा?

चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसण्याची शक्यता आहे. या भागांसह आजूबाजूच्या काही परिसरातही १६ आणि १७ मे रोजी अतिवृष्टी ते मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. किनारपट्टीवर ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत.

चक्रीवादळाचा मार्ग

तौत्के चक्रीवादळ १६ मे रोजी अतितीव्र स्वरूप धारण करणार आहे. त्यामुळे समुद्रात वाऱ्यांचा वेग ताशी १२५ ते १७५ किलोमीटर असेल. १६ ते १८ मे या कालावधीत ते अतितीव्रच राहणार असून, याच काळात ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळून जाणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या संभाव्य मार्गानुसार चक्रीवादळ १८ मे रोजी दुपार्री किंवा संध्याकाळी गुजरातच्या पोरबंदरजवळ धडकून पुढे जाईल. त्यानंतर त्याचा वेग आणि प्रभाव कमी होईल. मात्र, त्यामुळे गुजरातमध्ये त्याचा मोठा तडाखा बसण्याची शक्यता आहे.

 

मराठवाडा, विदर्भातही पाऊस

मराठवाडा आणि विदर्भात चक्रीवादळाचा परिणाम होणार नसला, तरी या भागातील कमी दाबाच्या वेगळ्याच क्षेत्रामुळे पावसाची शक्यता आहे. उत्तरपूर्व राजस्थानपासून थेट मराठवाड्यापर्यंत सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

वादळ सज्जतेचा  मोदींकडून आढावा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तौत्के चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी राज्ये, केंद्रीय मंत्रालये आणि संबंधित यंत्रणांनी केलेल्या तयारीचा आढावा घेतला आणि त्यांना शक्य त्या सर्व उपाययोजना करून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या. वीजपुरवठा, दूरध्वनीसेवा, आरोग्यसेवा आणि पाण्याचा पुरवठा बाधित झाल्यास तो त्वरित सुरू करण्यात यावा आणि वादळकाळात करोना रुग्णांवरील उपचारांचे व्यवस्थापन करण्याचे निर्देशही मोदी यांनी दिले. या बैठकीस गृहमंत्री अमित शहा हेही उपस्थित होते.

वीजपुरवठ्यासाठी…

बेस्ट, राज्य विद्युत वितरण महामंडळ आणि अदानी इलेक्ट्रिसिटी या कंपन्यांना मनुष्यबळासह सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन महावितरण कं पनीने कर्मचाऱ्यांच्या सुट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर…

करोना साथीच्या परिस्थितीमुळे मोठी करोना रुग्णालये, प्राणवायूनिर्मिती प्रकल्प आणि पुनर्भरण उद्योग, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्रे, पाणीपुरवठा, मोबाईल टॉवर्स, रेल्वे आणि अन्य अत्यावश्यक सेवांसह घरगुती वीजपुरवठा पूर्ववत करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

राज्याची तयारी

’मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणात सतर्कतेचे आदेश दिले आहेत. किनारपट्टीवरील भागांत पूर्णपणे सतर्क राहून यंत्रणांनी मदत आणि बचाव कार्य करावे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनास दिल्या आहेत.

’खबरदारी म्हणून किनाऱ्याजवळच्या गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याच्या आणि त्यांना सर्व सुविधा पुरविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

सतर्कता म्हणून ५८० करोना रुग्णांचे स्थलांतर

चक्रीवादळामुळे तात्पुरत्या शेडमध्ये उभारलेल्या मोठ्या करोना रुग्णालयात कोणतीही हानी होऊ नये म्हणून पालिकेने या रुग्णालयांमधील ५८० रुग्णांना पालिकेच्या अन्य रुग्णालयांत स्थलांतरित करण्याचे आदेश शनिवारी दिले. तसेच करोना केंद्रांजवळ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.