पिंपरी चिंचवडमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू

विद्यार्थ्याचा गळफास घेऊन, तर शॉक लागून इसमाचा मृत्यू

suicide
प्रतिकात्मक छायाचित्र

पिंपरी चिंचवडमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. यातील एका घटनेत विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, तर दुसऱ्या घटनेत विजेचा धक्का लागलेल्या महिलेला वाचवण्यासाठी गेलेल्या इसमाचा मृत्यू झाला आहे. उज्ज्वल शहा असे गळफास घेतलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तर दुसऱ्या घटनेत महिलेच्या बचावासाठी गेलेल्या सागर बोऱ्हाडे यांना प्राण गमवावा लागला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमध्ये विविध दोन घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. उज्ज्वल उमेश शहा (वय वर्ष २०, रा. दिल्ली) हा विद्यार्थी दिल्ली येथून आज सकाळी पिंपरी चिंचवडमध्ये एमआयटी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी नेहरुनगर येथे मित्रांकडे आला होता. मात्र आज सायंकाळी पाचच्या सुमारास उज्ज्वलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून पिंपरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दुसऱ्या दुर्दैवी घटनेत एका इसमाचा मृत्यू झाला आहे. सागर गौतम बोऱ्हाडे (वय वर्ष ३० रा. कांबळे चाळ, दापोडी) असे मृत पावलेल्या इसमाचे नाव आहे. रुथा प्रकाश पंडित (वय वर्ष ३५ रा.कांबळे चाळ, दापोडी) ही महिला लोखंडी तारेवर कपडे वाळत घालण्यासाठी गेली असता तिला विजेचा धक्का लागला. या महिलेला वाचवण्यासाठी गेलेल्या सागरला विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी दोनच्या सुमारास घडली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Two died in pimpri chinchwad in two incidents