व्हॅन खड्डय़ात कोसळून आजी आणि नात ठार

जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर भरधाव व्हॅन खड्डय़ात कोसळून झालेल्या अपघातात आजी आणि तिची सहा महिन्यांची नात ठार झाली. या अपघातात आठ जण गंभीर जखमी झालेआहेत.

जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर भरधाव व्हॅन खड्डय़ात कोसळून झालेल्या अपघातात आजी आणि तिची सहा महिन्यांची नात ठार झाली. या अपघातात आठ जण गंभीर जखमी झालेआहेत. शुक्रवारी सायंकाळी वडगाव-मावळ येथे जांभुळ फाटानजीक ही दुर्घटना घडली.
हिराबाई सदाशिव जाधव (वय ६५, रा. फुलेनगर, येरवडा) आणि सई मंगेश जाधव (वय सहा महिने) अशी ठार झालेल्या आजी-नातीची नावे आहेत. तर संजय डावरे, देवांगणा डावरे, सीमा डावरे, अंकिता डावरे, शंतनू डावरे यांच्यासह आठ जण या अपघातात जखमी झाले आहेत. हे सर्व जण येरवडा परिसरातील रहिवासी आहेत. जाधव आणि डावरे हे नातेवाईक आहेत. ते मुंबईत नातेवाइकांच्या विवाहासाठी व्हॅनमधून निघाले होते.
वडगाव-मावळ येथे जांभुळ फाटानजीक शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या कडेला दुभाजकावर व्हॅन आदळली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने व्हॅन खड्डय़ात कोसळली. या अपघाताची वडगाव-मावळ पोलिसांना माहिती मिळाली. जखमींना तातडीने सोमाटणे फाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच हिराबाई आणि त्यांची सहा महिन्यांची नात सई या मरण पावल्या होत्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Two died in road accident