पुणे : मध्यरात्री रस्त्याने जात असताना दुचाकीची हुलकावणी दिल्याच्या रागातून एका तरुणावर आणि त्याच्या मित्रावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना इंदीरानगर भागात घडली. त्यात दोघे जखमी झाले असून, या प्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी रोहित गायकवाड आणि अंबाजी शिंगे (दोघे रा. गोसावी वस्ती, हडपसर) यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अरफात रज्जाक लब्बै (वय २३ रा. सय्यद नगर, महंमदवाडी रोड, हडपसर) याने फिर्याद दिली आहे. हा प्रकार बुधवारी मध्यरात्री म्हाडा कॉलनी रस्त्यावर इंदिरानगर येथे घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण आणि आरोपी हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. फिर्यादी हा त्याच्या पाहुण्याकडे दुचाकीवरून निघाला होता. त्यावेळी गोसावी वस्ती येथे त्याच्या दुचाकीची हुलकावणी रोहित याला बसली. त्याचा राग रोहित याच्या मनात होता. त्यातूनच त्याने फिर्यादी हा त्याच्या मित्राला भेटण्यासाठी इंदीरानगर वसाहत येथे आला असताना त्याच्यावर कोयत्याने वार केले. अंबाजी याने फिर्यादीच्या मित्राला हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक डांगे करीत आहेत.