गुन्हे शाखेकडे तपास; मध्यस्थांच्या पोलीस कोठडीत वाढ
रुबी हॉल क्लिनिकमधील बेकायदा किडनी प्रत्यारोपण प्रकरणात मध्यस्थांना अटक करण्यात आल्यानंतर चौकशीत बेकायदा किडनी प्रत्यारोपणाचे आणखी दोन प्रकार उजेडात आले आहेत. न्यायालयाने दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचे आदेश बुधवारी दिले.

बेकायदा किडनी प्रत्यारोपण प्रकरणात मध्यस्थ अभिजित शशिकांत गटणे (वय ४०, रा. रजपूत वीटभट्टीजवळ, एरंडवणे गावठाण) आणि रवींद्र महादेव रोडगे (वय ४३, रा. लांडेवाडी, पिंपरी चिंचवड) यांना अटक करण्यात आली आहे.
दोघांनी सहा वर्षांपूर्वी बदलापूर येथील एका डॉक्टरांच्या वडिलांना इस्लामपूर येथील एकाची किडनी त्यांचा कुटुंबातील मित्र असल्याचे दाखवून किडनी मिळवून दिली होती. तसेच पंढरपूर येथील एका व्यक्तीला पुण्यातील एका महिलेची किडनी त्याची पत्नी असल्याचे नाते दाखवून मिळवून दिली. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालय आणि कोइमतूर येथील केएचसीएच रुग्णालयात या किडन्यांचे प्रत्यारोपण झाले, असे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

सहायक सरकारी वकील ॲड. दिलीप गायकवाड यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोघांच्या पोलिस कोठडीत २१ मेपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.