पुणे : भरधाव मोटार बंडगार्डन मेट्रो स्थानकाच्या खांबावर आदळल्याची घटना रविवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली. अपघातात मोटारीतील दोघांचा मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेले दोघे जण चुलत भाऊ असून, या अपघातात आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघात नेमका कसा झाला, याची माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत भरधाव वेगामुळे अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
यश प्रसाद भंडारी (वय २३, रा. थेरगाव, पिंपरी चिंचवड), ऋत्विक ऊर्फ ओम विनायक भंडारी (वय २३, रा. पिंपरी गाव) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अपघातात खुशवंत टेकवाणी (वय २५, मूळ रा. बीड) हा गंभीर जखमी झाला आहे. मोटार चालकाने मद्यप्राशन केल्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव मोटार रविवारी पहाटे पाचच्या बंडगार्डन रस्त्यावरुन निघाली होती. मोटारीची नोंदणी पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयातील आहे. मोटारीत यश भंडारी, त्याचा चुलत भाऊ ओम, खुशवंत टेकवाणी हे होते. मोटार चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार बंडगार्डन मेट्रो स्थानकाजवळ असलेल्या खांबावर आदळली. अपघातानंतर मोठा आवाज झाला. रविवारी पहाटे कामावर निघालेल्या नागरिकांनी अपघाताच आवाज ऐकला आणि घटनास्थळी धाव घेतली. मोटारीचा वेग एवढा जोरात होता की, मोटारीचा चुराडा झाला होता. मोटारीच्या पाठीमागील आसनावर बसलेला तरुण बेशुद्धावस्थेत पडला होता. मोटारीच्या काचा त्याच्या शरीरात शिरल्या होत्या. अपघाताची माहिती नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली.
पोलिसांनी यश भंडारी, ओम भंडारी, खुशवंत टेकवाणी यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच यश आणि ओम यांचा मृत्यू झाला होता. खुशवंत याच्यावर खासगी रुग्णलायातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्यचाची माहिती पोलिसांनी दिली. कोरेगाव पार्क अपघाताच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
