पुणे : शाॅर्टसर्किट झाल्यानंतर गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना वारजे भागातील गोकुळनगर परिसरात मध्यरात्री घडली. मोहन माणिक चव्हाण (वय ४३), आतिश मोहन चव्हाण (वय २३, दोघे सध्या रा. गोकुळनगर, वारजे माळवाडी) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. गोकुळनगर भागात एका पत्र्याच्या खोलीत मोहन आणि आशिष राहायला होते. मध्यरात्री सिलिंडरमधून गॅसगळती होऊन स्फोट झाल्याची माहिती वारजे अग्निशामक केंद्राला मिळाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे केंद्रप्रमुख प्रभाकर उमराटकर, तांडेल मरळ, जवान भिलारे, माने, साळुंखे, ओव्हाळ यांच्यासह जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. दोघांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली.
शाॅर्टसर्किट झाल्यानंतर घरात आग लागली. त्या वेळी चव्हाण गाढ झोपेत होते. आग लागल्यानंतर दोघे जण झोपेतून जागे झाले. त्यानंतर ते घरातील मोरीत लपले. खोलीतील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरला आग लागून स्फाेट झाला. या घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले, अशी माहिती अग्निशामक दलाचे केंद्रप्रमुख प्रभाकर उमराटकर यांनी दिली. वारजे पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
मोहन मजुरी करायचे. त्यांच्या पत्नीचे वर्षभरापूर्वी निधन झाले. त्यांना तीन मुलगे असून, एक मुलगा गावी असतो. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेला आतिश आणि त्याचा भाऊ वडिलांसोबत राहत होते. आतिशचा भाऊ वारजे भागातील एका उपाहारगृहात कामाला होता.
कचरा डेपाेला आग
हडपसर-सासवड रस्त्यावरील उरुळी देवाची येथील कचरा डेपोत मंगळवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. आग भडकल्यानंतर परिसरात धुराचे लोट पसरले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाचे पाच बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले. दलाचे केंद्रप्रमुख कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करून रात्री उशिरा आग आटोक्यात आणली. आग लागण्याचे कारण समजू शकले नाही. यापूर्वी डेपोतील कचऱ्याला आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. कचऱ्याने पेट घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरतात. आग धुमसत राहते. त्यामुळे कचरा डेपोतील आग आटोक्यात आणण्यासाठी तेथे बंब तैनात करण्यात आले. आग पूर्णपणे आटोक्यात येण्यासाठी वेळ लागतो, अशी माहिती माहिती अग्निशामक दलाकडून देण्यात आली.