scorecardresearch

पुणे-अहमदनगर रस्त्यावर वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

भरधाव पीएमपी बसने दुचाकीस्वारास उडवले

road-accident
(प्रतिनिधिक छायाचित्र)

पुणे ते अहमदनगर रस्त्यावर वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राहुल प्रकाश धोत्रे (वय ३२, रा. रहेजा गार्डन, वानवडी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत राहुलचे वडील प्रकाश यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राहुल एका खासगी कार्यालयात काम करत होता. कार्यालयीन कामासाठी तो वाघोलीला गेला होता. तेथील काम आटोपून तो नगर रस्त्याने परत येत होता. त्या वेळी चंदननगर परिसरात भरधाव पीएमपी बसने दुचाकीस्वार राहुलला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या राहुलचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला.

या प्रकरणी पीएमपी चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एस. पाठक तपास करत आहेत.
दरम्यान, नगर रस्त्यावरील पेरणे फाटा परिसरात मोटारीच्या धडकेने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अजय शिंदे (वय १८, रा. केसनंद फाटा, वाघोली, नगर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवासी तरुणाचे नाव आहे. याबाबत अजय शिंदेचा मित्र शुभम भालेराव (वय २१, रा. वाघोली, मूळ रा. शेवगाव, जि. अहमदनगर) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार शुभम आणि अजय यात्रेसाठी जात होते. मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास नगर रस्त्यावरील पेरणे फाटा परिसरात एका उपाहारगृहाजवळ ते चहा प्यायला थांबले होते. दुचाकी त्यांनी रस्त्याच्या कडेला लावली होती. त्या वेळी भरधाव मोटारीने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या अजयला धडक दिली. अपघातात अजयचा मृत्यू झाला. त्याचा मित्र शुभमला याला किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर मोटारचालक पसार झाला असून पोलीस कर्मचारी एस. बी. माने तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two killed in pune ahmednagar road mishap pune print news msr

ताज्या बातम्या