पुणे : भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हडपसरमधील भेकराईनगर परिसरात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

नितीन वसंत कांबळे (रा. भीमदीप वसाहत, बिबवेवाडी ) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कांबळे यांचे भाऊ सचिन (वय ४५) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन कांबळे हे १६ फेब्रुवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास बिबवेवाडीतील स्वामी विवेकानंद रस्त्याने निघाले होते. त्या वेळी भरधाव वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या कांबळे यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहन चालक पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. कांबळे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस हवालदार गायकवाड तपास करत आहेत.

हडपसर भागात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शिवम चंद्रकांत माने (वय २३, रा. गोविंदनगर, वाखरी विसावा, पंढरपूर, जि. सोलापूर ) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत शिवम याचा भाऊ शुभम (वय २५) याने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार शिवम हा बुधवारी (१८ फेब्रुवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास हडपसर-सासवड रस्त्यावरील फुरसुंगी भागातून निघाला होता. त्या वेळी भेकराईनगरमधील शिवशक्ती चौकात भरधाव ट्रकने दुचाकीस्वार शिवम याला धडक दिली. अपघातात शिवम गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पसार झालेल्या ट्रक चालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक धुमाळ तपास करत आहेत.

शहर परिसरात गंभीर स्वरूपाच्या अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बहुतांश अपघात हे भरधाव वेग आणि वाहन चालकांच्या चुकांमुळे झाले आहेत. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांविरुद्ध नुकतीच कारवाई केली. विरुद्ध दिशेने, तसेच ट्रिपल सीट जणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विशेष मोहिमेत पोलिसांनी बेेशिस्त वाहन चालकांकडून एक कोटी रुपयांचा दंड वसूल केला. वाहतूक नियमभंग करणाऱ्या दुचाकीस्वारांच्या दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या. कागदपत्रांची पूर्तता, तसेच दंडात्मक कारवाईनंतर दुचाकी परत करण्यात आल्या.

रविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेच्या पिशवीतून दागिने चोरी

पुणे : रविवार पेठेतील एका दुकानात खरेदी करणाऱ्या एका महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी दागिने चोरुन नेल्याची घटना घडली.

याबाबत एका महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अहो.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला महात्मा फुले पेठेत राहायला आहेत. त्या रविवार पेठेत १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी बहिणीसह खरेदीसाठी आल्या होत्या. एका दुकानात त्या खरेदी करत होत्या. त्या वेळी त्यांच्या पिशवीतून चोरट्यांनी सोन्याची अंगठी आणि रोकड असा २७ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस हवालदार हर्षल दुडम तपास करत आहेत.

शहराच्या मध्य भागातील बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या महिलांकडील दागिने, रोकड चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तुळशीबाग, रविवार पेठेतील बोहरी आळी परिसरात महिलांकडील ऐवज चोरून नेण्याच्या घटना घडल्या होत्या.