पुणे : दुचाकीच्या डिकीतून मोबाइल संच, पाकीट, डेबिट कार्ड चोरून नेण्यात आल्याची घटना हडपसरमधील रामटेकडी परिसरात घडली. चोरट्याने डेबिट कार्डचा गैरवापर करून तक्रारदार तरुणाच्या बँक खात्यातून दोन लाख २१ हजार रुपये लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला.

याबाबत एका तरुणाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण एका परीक्षेसाठी २ जून रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास हडपसर भागातील रामटेकडी परिसरात गेला होता. एका कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर त्याने दुचाकी लावली. चोरट्याने दुचाकीची डिकी उचकटून मोबाइल संच, पाकिटातील रोकड, डेबिट कार्ड चोरून नेले. त्यानंतर डेबिट कार्डचा गैरवापर करून बँक खात्यातून दोन लाख २१ हजार रुपये लंपास केले. पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे तपास करत आहेत.