scorecardresearch

दुचाकी चोरट्यांना पकडले ; सहा दुचाकी जप्त

चौकशीत त्यांनी चंदननगर, लोणीकंद, हडपसर, मुंढवा परिसरातून दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले आहे.

दुचाकी चोरट्यांना पकडले ; सहा दुचाकी जप्त
प्रतिनिधिक छायाचित्र

पुणे : शहर परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली. आरोपी दिवसा टँकरवर चालक म्हणून काम करायचे. चोरट्यांकडून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

आकाश उर्फ बबलू बापू कांबळे (वय २३, रा. मांजरी बुद्रुक ता. हवेली), दीपक उर्फ जोजो बाबुराव सरवदे ( वय २६, रा. मांजरी खुर्द, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.  कांबळे आणि सरवदे मूळचे लातूरमधील आहेत. दोघे जण पुण्यात कामानिमित्त आले आहेत. शहरातील दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांकडून गस्त घालण्यात येत होती. पोलीस कर्मचारी अमोल सरतापे, विनायक येवले यांना चोरट्यांची माहिती मिळाली. दोघांना ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत त्यांनी चंदननगर, लोणीकंद, हडपसर, मुंढवा परिसरातून दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून एकूण सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. दोघेजण शहरात टँकरवर चालक म्हणून काम करतात. रात्री वाहनचोरीचे गुन्हे करत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश लोखंडे, विनायक रामाणे, शिवाजी जाधव, राहुल इंगळे, संदीप येळे आदींनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या