पुणे : नगर रस्ता परिसरात वेगवेगळ्या अपघातात पादचारी महिलेसह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.वाघोली भागातील मरकळ-तुळापूर रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सचिन सतीश काळे (वय २६, सध्या रा. रायसोनी काॅलेजसमोर, वाघोली, नगर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याबाबत सचिन यांचे वडील सतीश काळे (वय ५० रा. भिरवली, ता. ओैसा, जि. लातूर) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार सचिन २ ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास मरकळ-तुळापूर रस्त्यावरुन निघाले होते. फुलगाव परिसरात श्री दत्त हाॅटेलसमोर भरधाव वाहनाने दुचाकीस्वार सतीश यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सचिन यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक निलेश घोरपडे तपास करत आहेत.

नगर रस्ता परिसरात भावडी गाव परिसरात डंपरच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनीता नंदू बोडरे (वय ४३, रा. राऊत वस्ती, तुळापूर, नगर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी डंपरचालक संताेष मधुकर तावरे (वय ३६, सध्या रा. सातव स्टोन कंपनी, वाघोली, नगर रस्ता, मूळ रा. काकडहिरा, ता. पाटोदा, जि. बीड) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मंगेश चव्हाण (वय ३६, रा. वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुनीता बोडरे बुधवारी (७ ऑगस्ट) कदम वस्ती परिसरातून निघाल्या होत्या. भावडी गावाजवळ भरधाव डंपरने त्यांना सकाळी सव्वानऊच्या सुमारास डंपरने धडक दिली. बोडरे यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ केदार तपास करत आहेत.