पुणे : नगर रस्ता परिसरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. वेगवेगळ्या अपघातात डंपरच्या धडकेत दुचाकीस्वारासह ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. खराडी आणि वाघोली भागात अपघाताच्या घटना घडल्या. खराडी परिसरात भरधाव डंपरच्या धडकेत एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रथमेश प्रभाकर शिंदे (वय २३, रा. कमला नेहरू रुग्णालयासमोर, करबा पेठ) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी डंपरचालक हनुमंत एकनाथ लोहबंधे (वय ४५, रा. संतनगर लोहगाव, मूळ रा. पाडुर्णी, ता.मुखेड, जि. नांदेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई रोहित बाजीराव कट्टे (वय २९) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दुचाकीस्वार प्रथमेश शिंदे रविवारी (११ ऑगस्ट) दुपारी एकच्या सुमारास नगर रस्त्यावरील खराडी परिसरातून निघाले होते. जनक बाबा पीर दर्ग्यासमोर भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार प्रथमेश यांचा मृत्यू झाला. हेही वाचा - पिंपरी : हप्त्यासाठी मासे विक्रेत्या महिलेवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न, दोन महिलांवर गुन्हा हेही वाचा - पुणे : लोहगावमधील आरआयटी महाविद्यालयाच्या आवारात बिबट्याचा वावर; वनविभाग, अग्निशमन दलाकडून शोधमोहीम नगर रस्त्यावरील वाघोली भागात डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अलका गणेशराव जुनगडे (वय ६६ रा. वाघोली) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अलका यांचा मुलगा पियूष (वय ३६, रा. वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी डंपरचालक राहुल शिवाजी लोखंडे (रा. खांदेवेनगर, वाघोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीस्वार पियुष जुनगडे आईसोबत शनिवारी (१० ऑगस्ट) निघाले होते. वाघोली परिसरात भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार पियूष जखमी झाले. सहप्रवासी अलका यांचा चाकाखाली सापडून मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक धामणे तपास करत आहेत.