महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या १०७ वर पोहचली आहे. अशात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पुण्यातल्या जोडप्याची करोना टेस्ट निगेटीव्ह आली आहे. दोन आठवड्यांपूर्वी त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांना नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात करोनाची लागण झालेले हे पहिले दोघे होते. त्यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

करोनाचा फैलाव वाढू नये म्हणून संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसंच महाराष्ट्रात आणि पंजाबमध्ये कर्फ्यूही लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी आहे. लोकांनी बाहेर पडू नये असंही आवाहन सरकारने केलं आहे. करोनाशी सगळा देश झुंजतो आहे. अशात महाराष्ट्रात सर्वात आधी आढळलेल्या दोन रुग्णांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यातील नायडू रुग्णालयात १० तारखेला आणखी तिघे जण करोना बाधित आढळले होते. त्या तिघांची पहिली तपासणी निगेटिव्ह आली असून आता दुसर्‍या तपासणीचा रिपोर्ट आज संध्याकाळी आल्यानंतर उद्या त्यांना सोडले जाईल अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.