शेततळ्यात पोहण्यासाठी उतरलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सिंहगड रस्ता परिसरातील धायरीत रविवारी घडली.

सूरज शरद सातपुते (वय १४), पुष्कर गणेश दातखिंडे (वय १३, दोघे रा. नालंदा हायस्कूलशेजारी, धायरी) अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. धायरीतील रायकर मळा भागात खंडोबा मंदिराजवळ शेततळे आहे. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास सूरज, पुष्कर आणि त्यांचा मित्र अथर्व चव्हाण खंडोबा मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तेथून काही अंतरावर शेत आहे. सीमाभिंतीवरुन उडी मारुन सूरज, पुष्कर आणि अथर्व शेतात गेले. त्यानंतर शेततळ्यात सूरज आणि पुष्कर पोहण्यासाठी उतरले. अथर्व काठावरच थांबला होता.

शेततळ्यात आठ ते नऊ फूट पाणी आहे. शेततळ्याच्या तळाला चिकट माती होती तसेच उतार असल्याने पाण्यात पोहण्यासाठी उतरलेले सूरज आणि पुष्कर यांना शेततळ्यातून बाहेर पडता आले नाही. दमछाक झाल्याने दोघेजण तळ्यात बुडाले. त्यांच्या बरोबर असलेला मित्र अथर्वने या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना दिली.

शेततळ्यात दोन मुले बुडाल्याची माहिती पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाला स्थानिक नागरिकांनी दिली. त्यानंतर सिंहगड रस्ता अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रभाकर उमराटकर आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहिम राबविली. दोघांना शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले. दोघांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी झाली. पुष्कर आणि सूरजचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर परिसरात शोककळा पसरली.