नगर रस्त्यावरील वडगाव शेरी येथून बेपत्ता झालेल्या दोन शाळकरी मुलींनी मुळा-मुठा नदीच्या पात्रात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमप्रकरणाचा आई-वडिलांना सुगावा लागल्याने दोघींनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघींनी याबाबतची कल्पना प्रियकरांना दिली होती.
स्नेहा सदानंद मोरे (वय १५) आणि छोटीकुमारी अजितकुमार सिंग (वय १५, दोघी रा. वडगाव शेरी) अशी आत्महत्या केलेल्या शाळकरी मुलींची नावे आहेत. त्या दोघी येरवडा भागातील एका शाळेत दहावीत शिकत होत्या. शनिवारी (१६ जुलै) दुपारी स्नेहा आणि तिची मैत्रीण छोटीकुमारी या दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मैत्रीण ऐश्वर्याकडे जेवण करण्यासाठी निघाले असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांना सांगून घरातून बाहेर पडल्या होत्या. त्यांच्यासोबत आणखी एक मैत्रीण होती. त्यानंतर छोटीकुमारीच्या बहिणीने तिच्याशी मोबाइलवर संपर्क साधला. ‘तू आज शाळेत गेली नव्हती. वडिलांना तुझ्या प्रेमप्रकरणाची कुणकुण लागली आहे,’ असे तिने छोटीकुमारीला सांगितले होते. त्यामुळे स्नेहा आणि छोटीकुमारी घाबरल्या होत्या.
त्यानंतर दोघींनी त्यांच्या प्रियकरांना बोलावून घेतले. येरवडा भागात त्यांना त्या भेटल्या आणि आम्ही आता आत्महत्या करणार आहोत, असे त्यांनी सांगितले होते. दरम्यान, स्नेहा आणि छोटीकुमारी बेपत्ता झाल्यानंतर पालकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि दोघींचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर स्नेहा, छोटीकुमारी आणि तिच्या दोन मैत्रिणींचे वडगाव शेरीतील चार मुलांशी प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मंगळवारी (१९ जुलै) पोलिसांनी त्या मुलांना बोलावून चौकशी केली. तेव्हा त्यांनी दोघी आत्महत्या करणार असल्याची माहिती पोलिसांना दिली. बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात दोन मुलींचे मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना तेथील रहिवाशांनी कळविली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने दोघींच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि या घटनेची माहिती दिली.
दोघींनी एकमेकींच्या हाताला दोरी बांधून नदीपात्रात उडी मारली. दोघींचे मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पी.आर.पाटील यांनी दिली.