पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या मुलाबरोबर असलेल्या दोन मित्रांच्या रक्ताच्या नमुन्यात बदल केल्याप्रकरणी अटक केलेल्या दोघांंना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश अतिरक्त सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी सोमवारी दिले.आदित्य अविनाश सूद (वय ५२, रा. सोपानबाग सोसायटी, बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी), आशिष सतीश मित्तल (वय ३७, रा. स्काय वेलवेडर सोसायटी, विमाननगर) अशी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी (२६ ऑगस्ट) संपली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

गुन्हा घडल्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणात आणखी काही आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यादृष्टीने तपास करायचा असल्याचे पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील राजेंद्र कुंभार यांनी युक्तिवादात केली. आरोपींच्यावतीने ॲड. अबिद मुलाणी, ॲड. सिओल शहा, ॲड. ध्वनी शहा, ॲड. विनीत शेट्टी, ॲड. वेंकटेश शेवाळे, ॲड. आर. व्ही. कातोरे यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने सूद आणि मित्तल यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. आरोपींच्या वतीने बुधवारी (२८ ऑगस्ट) जामीन मिळवण्यासाठी अर्ज करण्यात येणार आहे, असे बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितले.