पुणे : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील दोन शिक्षक राष्ट्रीय पातळीवरील सन्मानाचे मानकरी ठरले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार गडचिरोली जिल्ह्य़ातील खुर्शीद शेख आणि उस्मानाबाद जिल्ह्य़ातील उमेश खोसे यांना जाहीर झाला आहे.

खुर्शीद शेख म्हणाले, की गडचिरोली मुख्यालयापासून माझी शाळा २४३ किलोमीटरवरील शिरोंचा तालुक्यातील दुर्गम भागात आहे. तेलंगणा आणि छत्तीसगढ सीमेवरील हा भाग आहे. गावात तेलुगू भाषिक आणि आदिवासी विद्यार्थी आहेत. गेली १५ वर्षे या शाळेत शिक्षक कार्यरत आहेत. शाळेत आलो तेव्हा ४५ विद्यार्थी होते, आता २०८ विद्यार्थी आहेत. आनंददायी शिक्षणासाठी शाळेचे सुशोभीकरण के ले, जॉयफुल लर्निग इन चाइल्डहूड  म्हणजे जॉलिवूड हा उपक्रम राबवला. मुलांची भाषा सुधारण्यासाठी लघुपट तयार केले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न केले. आता शाळेत तीन हजार पुस्तकांचे ग्रंथालय आहे. या कामी शिक्षण विभागाचे अधिकारी, असरअली गाव आणि कृतिशील शिक्षक महाराष्ट्र या गटाचे खूप सहकार्य लाभले. राष्ट्रीय पुरस्कारामुळे अधिक चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.

उमेश खोसे उस्मानाबाद जिल्ह्य़ातील उमरगा तालुक्यातील कडदोरा गावातील जगदंबानगर शाळेत कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिकवण्याच्या, त्यांचा सर्वागीण विकास साध्य करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा सन्मान या पुरस्काराच्या रूपाने झाला आहे. १२ वर्षे तांडा शाळेत काम केले होते. त्या शाळेत मुलांची बोलीभाषा बंजारा असल्याने त्या मुलांसाठी पहिलीचे भाषा विषयाचे पाठय़पुस्तक बंजारा बोलीमध्ये अनुवादित केले. त्या शाळेत सुरुवातीला ४० मुले होती. ती पटसंख्या १०४ पर्यंत वाढली. तर आताच्या शाळेत केवळ १४ पटसंख्या होती, ती आता ३० पर्यंत वाढली आहे. करोनाकाळात मुलांच्या घरी जाऊन ऑनलाइन ऑफलाइन पद्धतीने सुरू आहे. शाळेचे संकेतस्थळ तयार करून निकालही ऑनलाइन जाहीर केला. करोनाकाळात मनोरंजनात्मक खेळ, गणित, इंग्रजी या विषयी मार्गदर्शन केले, असे खोसे यांनी सांगितले.

झाले काय?

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा मंगळवारी केली. यंदा एकूण ४४ शिक्षकांना पुरस्कार मिळाला आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाही पुरस्काराची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात आली होती. त्यात राज्यातील खुर्शीद शेख आणि उमेश खोसे पुरस्काराचे मानकरी ठरले. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षकांनी मिळवलेले यश लक्षणीय ठरले आहे.