पुण्यात मुलीची छेड काढल्याच्या गैरसमजातून तरुणांना विवस्त्र करुन बेदम मारहाण

आरोपींमध्ये अल्पवयीन मुलाचाही समावेश

छाया सौजन्य- सोशल मीडिया

पुण्यात जमावाच्या अमानुष कृत्याचं रौद्र रुप पाहायला मिळालं. मुलीची छेड काढल्याच्या गैरसमजातून कर्वेनगरमध्ये दोन तरुणांना विवस्त्र करुन बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १६ मे रोजी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ ‘एएनआय’ने ट्विट केला आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांमुळे त्यावर पुन्हा एकदा सर्वांना विचार करण्यास भाग पाडले आहे.

मारहाण झालेल्या त्या दोन तरुणांपैकी एकाच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांपैकी चौघांना ताब्यात घेतलं असून, त्यात संबंधित मुलीच्या वडिलांचाही समावेश आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, नवीन खुराना (४७), यश नवीन खुराना (१९), राजू देवासी (२४) प्रदीप साळुंखे (३५) या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोपींवर कलम ३५५, ३४१ आणि ३२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. त्यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. मारहाण झालेल्या एका तरुणाच्या आईने या घटनेची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. आपल्या मुलाला बेदम मारहाण केल्याचं तिने सांगितले. विनाकारण मारहाण केल्यामुळे माझ्या मुलाला मानसिक धक्का बसला आहे. त्याच्या शरीरावर मारहाणीचे व्रण आहेत. एका कानाला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच कानाचा पडदाही फाटला आहे, अशी माहिती त्याच्या आईने दिली. याशिवाय त्यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबतही खंत व्यक्त केली.

दरम्यान, या घटनेनंतर मुलीच्या पालकांनीही आपली बाजू मांडली. तो मुलगा आमच्या मुलीला विनाकारण त्रास देत आहे, असं आम्हाला वाटलं, गैरसमजुतीतून हा सर्व प्रकार घडला, अशी सारवासारव त्यांनी केली. ‘पुणे मिरर’च्या वृत्तानुसार, दोन पीडित तरुण मुलीच्या घराबाहेर कोणाची तरी वाट पाहात उभे होते. ते पाठलाग करत असल्याचा मुलीचा समज झाला. त्यातूनच ही मारहाणीची घटना घडली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Two teens thrashed paraded naked in pune for alleged eve teasing

ताज्या बातम्या