पिंपरी : करोना रुग्णांच्या उपचारासाठी रक्तद्रव मागणी वाढत आहे. त्यामुळे रक्तद्रव दात्यांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याचा निर्णय पिंपरी पालिकेने घेतला आहे. त्याचप्रमाणे, पालिका रुग्णालयांमधील रक्तपेढ्यांतून मोफत रक्तद्रव उपलब्ध करून दिला जाणार आहे, अशी माहिती महापौर माई ढोरे व पक्षनेते नामदेव ढाके यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

करोनाबाधित रुग्णांना ‘प्लाझ्मा थेरपी’ फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे या उपचारपद्धतीकडे आशेचा किरण म्हणून पाहिले जात आहे. ही बाब लक्षात घेता रक्तद्रव दात्यांची संख्या वाढली पाहिजे, याकरिता अशा दात्यांना प्रोत्साहन म्हणून दोन हजार रुपये दिले जाणार आहेत. खासगी रुग्णालयात रक्तद्रवाचे शुल्क म्हणून सहा हजार रुपये घेतले जातात. पालिकेकडून मोफत रक्तद्रव पुरवठा केला जाणार असून त्याचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौरांनी केले आहे. ढाके म्हणाले, उन्हाळ्यामुळे रक्तदान मोहीम थंडावली असून करोना संसर्गामुळे रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा फटका रक्तद्रव दानाला बसला आहे. रक्तद्रव तुटवडा भरून काढण्यासाठी विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे.