फर्ग्युसन रस्त्यावर लोखंडी कठडय़ावर दुचाकी आदळून सहप्रवासी युवतीचा मृत्यू

अपघातात सहप्रवासी युवतीचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

(सांकेतिक छायाचित्र)

फर्ग्युसन रस्त्यावरुन गोखले स्मारक चौकाच्या दिशेने विरुद्ध दिशेने जात असलेला दुचाकीस्वार युवक आणि युवती लोखंडी कठडय़ावर आदळले. अपघातात सहप्रवासी युवतीचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

समृद्धी महेंद्र गुरसाळे (वय २३) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवासी युवतीचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार हृषीकेश अरुण बाबर (वय २५,रा. रविवार पेठ, सातारा) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस नाईक टी. व्ही. रायकर यांनी यासंदर्भात डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी आणि हृषीकेश पुण्यात शिक्षणासाठी आले आहेत. सोमवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास दुचाकीस्वार  हृषीकेश आणि समृद्धी फर्ग्युसन रस्त्याने गोखले स्मारक चौकाच्या (गुडलक चौक) दिशेने जात होते. फर्ग्युसन रस्त्यावर पदपथ रुंदीकरणाचे काम सुरु आहे. वाडेश्वर हॉटेलसमोर भरधाव दुचाकी लोखंडी कठडय़ावर (बेरिकेट्स) आदळली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच समृद्धीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, भरधाव दुचाकी चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वार हृषीकेश याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक जयवंत जाधव तपास करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Two wheeler collapsed and killed a fellow citizen