भाडय़ाने दुचाकी मिळणार म्हटले की गोव्यासारखे एखादे शहर आठवते. पण आता पुण्यातही दुचाकी भाडय़ाने मिळणार आहेत. काहीच दिवसांसाठी पुण्यात आलेल्यांना किंवा पर्यटकांना अ‍ॅक्टिव्हापासून अगदी बुलेटपर्यंतच्या दुचाकी भाडय़ाने घेऊन पुण्यनगरी दर्शनाचा आनंद घेता येणार आहे.
एलिट सेलिब्रेशन कंपनीतर्फे सुरू केलेल्या ‘स्नॅपबाइक्स’ या फर्मतर्फे ही सेवा सुरू करण्यात आली असून गुरुवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. सध्या ही सेवा १० दुचाकींसह सुरू करण्यात आली असून त्यात ७ अ‍ॅक्टिव्हा, १ पॅशन, १ डिस्कव्हर आणि एका बुलेट गाडीचा यात समावेश आहे. टेलिफोनद्वारे तसेच ऑनलाइन बुकिंग करून या दुचाकी आरक्षित करता येणार आहेत. कोरेगाव पार्कच्या सहाव्या गल्लीतील फर्मच्या कार्यालयातून या दुचाकी ग्राहकांना घेऊन जाव्या लागतील. एक दिवसासाठी वेगवेगळ्या दुचाकींना वेगवेगळे भाडे ठरवण्यात आले आहे. अ‍ॅक्टिव्हासाठी ३९९, पॅशन आणि डिस्कव्हरसाठी ४४९ आणि बुलेटसाठी ९९९ रुपये प्रतिदिन मोजावे लागणार आहेत, तसेच पेट्रोलही ग्राहकांनाच भरावे लागेल.
‘स्नॅपबाइक्स’चे व्यवसायवृद्धी व्यवस्थापक आशिष इंगळे म्हणाले, ‘‘पुण्यात पर्यटक तसेच व्यावसायिकही मोठय़ा प्रमाणावर येत असतात. यांपैकी ज्यांना रिक्षा किंवा कॅब सोईची नाही, त्यांना भाडय़ाने दुचाकी घेणे हा चांगला पर्याय आहे. पुण्यातील वाहतुकीवरील ताण पाहता ही यंत्रणा सोईची ठरेल. येत्या सहा महिन्यांत भाडय़ाच्या दुचाकींची संख्या वाढवून शंभपर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे. प्रत्येक दुचाकीबरोबर दोन हेल्मेट आम्ही देणार आहोत, तसेच दुचाकींना जीपीएस यंत्रणाही बसवण्यात आली आहे. या यंत्रणे द्वारे कोणती दुचाकी कुठे आहे हे आम्हाला कळेल. तसेच गाडय़ांना वेगाची मर्यादाही घालून देण्यात आली आहे.’’
 ‘हार्ले डेव्हिडसन’ देखील..
नजीकच्या काळात ‘हार्ले डेव्हिडसन’ आणि त्यासारख्या ‘प्रीमियम बाइक्स’ देखील भाडय़ाने देण्यास सुरुवात करणार असल्याचे इंगळे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘पुण्यात परदेशी नागरिकही मोठय़ा प्रमाणावर येतात. त्यांच्याकडून बुलेट आणि इतर प्रीमियम दुचाकींना चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.’’