लहानपणापासूनच त्याला बिगर मोटारीचे आकर्षण.. त्यात नववीमध्ये शाळा सुटल्यामुळे उनाडक्या करीत फिरणे सुरू केले.. चालत फिरण्याचा कंटाळा येऊ लागल्यामुळे त्याने एके दिवशी बिगर गिअरची दुचाकी चोरली.. अन् त्या दुचाकीतील पेट्रोल संपेपर्यंत ती फिरवत राहिला.. यामध्ये त्याला मौज वाटल्यामुळे त्याने बिगर गिअरच्या दुचाकी चोरण्यास सुरू केल्या. पण, तो एके दिवशी पोलिसांच्या जाळ्यात सापडा आणि त्याचा संपूर्ण भांडाफोड झाला. अल्पवयीन असल्यामुळे त्याची रवानगी रिमांड होम मध्ये करण्यात आली आहे. त्याने गेल्या काही महिन्यात तब्बल आठ दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.
खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा पंधरा वर्षीय मुलाबाबतची ही घटना. खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत आईवडील आणि भावासोबत राहतो. भावावर खडक पोलीस ठाण्यात काही गुन्हे दाखल आहेत. संबंधित मुलगा हा शिवाजी मराठा शाळेत शिकत होता. घरची परिस्थिती बेताचीच आहे. त्याने नववीमध्ये शाळा सोडल्यानंतर काम धंदा न करता इकडे-तिकडे फिरत होता. त्याला लहान पणापासूनच गाडय़ांची हौस होती. एके दिवशी त्याने बिगर गिअरची होंडा अ‍ॅक्टिव्हा मोटार चोरली. त्याने मोटारीतील पेट्रोल संपेपर्यंत दिवसभर ती अ‍ॅक्टिव्हा फिरवली. पेट्रोल संपल्यानंतर त्याने ती सोडून दिली. त्यानंतर पुन्हा नवीन गाडी चोरून मौजमजेसाठी असाच वापर करीत असे. हा प्रकार खडक पोलीस ठाण्याचे कर्मचारी अजय थोरात आणि अमोल पवार यांना खबऱ्याकडून समजला. त्यानुसार खडक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांच्या पथकाने गंज पेठेतील लोहियानगर भागात त्याला सापळा रचून ताब्यात घेतले.
त्या मुलाकडे तपास केल्यानंतर त्याने शहरातून आठ ठिकाणांहून दुचाकी चोरल्याचे पोलिसांना सांगितले. त्यातील चार दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्याला फक्त बिगर गिअरच्या दुचाकी चालविण्याची हौस असल्यामुळे तो अ‍ॅक्टिव्हा, डय़ुओ, मोपेड अशा दुचाकी चोरीत होता. दिवसभर त्यावरून शहरात मौजमजा करीत भटकत असे. त्यातील पेट्रोल संपले की ती त्या ठिकाणी सोडून द्यायची, असा त्याचा उद्योग होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पण, तो अल्पवयीन असल्यामुळे त्याची रवानगी रिमांड होममध्ये करण्यात आली आहे.