पुणे : मौजमजा करण्यासाठीसाठी शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना उत्तमनगर पोलिसांनी अटक केली. त्यापैकी एकाला अटक करण्यात आली असून त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी चोरट्याकडून २० दुचाकी जप्त केल्या. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची किंमत १५ लाख रुपये आहे. कोथरूड, उत्तमनगर, वारजे, भारती विद्यापीठ, सिंहगड रस्ता, बावधन, तसेच ग्रामीण पोलिसांच्या राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरट्याने दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
महेश हनुमानसिंग राजपूत (वय २३, रा. एनडीए पोलीस चैाकीमागे, उत्तमनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी वाहतूक नियमभंग करणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. एनडीए (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी) रस्त्यावरील उत्तमनगर परिसरात पोलिसांनी नाकाबंदी करुन दुचाकीस्वारांची तपासणी सुरू केली. तेव्हा अल्पवयीन दुचाकीवरुन निघाला होता. या दुचाकीला वाहन क्रमांकाची पाटी नव्हती. संशय आल्याने पोलिसांनी दुचाकीस्वार अल्पवयीनाला थांबविले. त्याच्याकडे दुचाकीची कागदपत्रे नव्हती. पोलिसांनी संशयावरुन चौकशी सुरू केली तेव्हा त्याने साथीदार राजपूत याच्या मदतीने उत्तमनगर भागताून दुचाकी चोरल्याची माहिती पोलिसांना दिली.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने राजपूत याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा दुचाकी चाेरल्याची कबुली राजपूत याने दिली. तपासात राजपूत आणि त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराने पुणे पोलीस, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, तसेच ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. राजपूत आणि अल्पवयीनाने मौजमजेसाठी दुचाकी चोरीचे गुन्हे केले असून, त्यांच्याकडून २० दुचाकी जप्त करण्यात आल्या.
अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, परिमंडळ तीनचे उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर, उपनिरीक्षक चेतन धनवडे, मुकेश कुरेवाड, राजनारायण देशमुख, प्रदीप शेलार, पृथ्वीराज गायकवाड, चेतन बराटे, परमेश्वर पाडळे यांनी ही कामगिरी केली.
