पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावाजवळ भरधाव मोटार उलटून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. अपघातात मोटारीतील तिघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैभव विठ्ठल जांभळे (वय २४, रा. तक्रारवाडी, ता. इंदापूर) आणि प्रतीक पप्पू गवळी (वय २२, रा. मोशी, ता. हवेली ) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
अपघातात आसिफ बशीर खान (वय २२), सूरज राजू शेळके (वय २३, दोघे रा. भिगवण, ता. इंदापूर) आणि ऋषिकेश बाळासाहेब येळे (वय २२, रा. इंदापूर) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वैभव याचा कपडे शिवण्याचा व्यवसाय आहे. प्रतीक एका शिक्षण संस्थेत ओैषध निर्माण अभ्यासक्रम करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव, प्रतीक, सूरज, आसिफ, ऋषीकेश मोटारीतून भरधाव वेगाने पुणे-सोलापूर महामार्गावरुन निघाले होते. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोलीजवळ मोटारीवरचे नियंत्रण सुटल्याने मोटार उलटली. अपघाताची माहिती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच वैभव आणि प्रतीकचा मृत्यू झाला.