लोणावळा : भुशी धरणात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. पैकी एक तरुण परराज्यातील आहे. दहा जणांचा ग्रुप भुशी धरण परिसरात मौजमजा करण्यासाठी गेला होता. पैकी, दोघे जण भुशी धरणाच्या पाण्यात उतरले, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. दोघांचे मृतदेह शिवदुर्ग टीम ने बाहेर काढले आहेत.
मो. जमाल आणि साहिल अश्रफअली शेख अशी धरणात बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नाव आहेत. जमाल आणि साहिल हे दोघे इतर आठ मित्रांसह लोणावळ्यात वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी भुशी धरण परिसरात आले होते. भुशी धरणाच्या कडेला तारेचे कुंपण केलं आहे. परंतु, हे कुंपण पर्यटकांनी तोडून काढलं आहे. त्या रस्त्यातून हे तरुण धरणाच्या पाठीमागे असलेल्या धबधब्यावर गेले होते. पैकी, जमाल आणि साहिल पोहण्यासाठी पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. इतर मित्र केवळ बघत राहिले. एक तरुण उत्तर प्रदेशातील तुलापूर येथील असून दुसरा पिंपरी- चिंचवड शहरातील डांगे चौकातील आहे. यावर्षी मान्सून वेळेच्या आधीच राज्यात पोहचल्याने धुवादार पाऊस झालेला आहे. भुशी धरण ही बऱ्या पैकी भरले आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगावर हिरवळ नटल्याने. हे दृश्य आणि गारवा अनुभवण्यासाठी लोणावळ्यात पर्यटक दाखल होत आहेत.
“प्रतिबंध घालण्यात आलेल्या ठिकाणी पर्यटकांनी जाऊ नये. भुशी धरणाच्या आजूबाजूला तारेचे कुंपण घालण्यात आले आहे. ते तुमच्या सुरक्षेसाठी आहे. ते ओलांडून जाऊ नये.” सुहास जगताप- वरिष्ठ पोलीस निरीक्षक