पुणे : शहरातील एरंडवणा परिसरात झिकाचे दोन रुग्ण आढळले आहेत. एक डॉक्टर आणि त्याच्या मुलीला झिकाचा संसर्ग झाला आहे. या दोघांमध्ये ताप आणि अंगावर लाल चट्टे उठल्याची सौम्य लक्षणे दिसून आली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींमध्ये अद्याप संसर्गाची लक्षणे दिसून आलेली नाहीत.

शहरात यंदा प्रथमच झिकाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. एरंडवण्यातील ४६ वर्षीय डॉक्टर आणि त्याच्या १५ वर्षीय मुलीला झिकाचा संसर्ग झाला आहे. सर्वप्रथम पुरूष रुग्णाला ताप आणि अंगावर लाल चट्टे उठल्याची लक्षणे दिसून आली. ते डॉक्टर असल्याने त्यांनी त्यांचा रक्त नमुना तपासणीसाठी १८ जूनला राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत पाठवला होता. त्यांना झिकाचा संसर्ग झाल्याचा अहवाल २० जूनला मिळाला.

हेही वाचा >>>युजीसीकडून पदव्युत्तर पदवीसाठीचा नवा आराखडा जाहीर… कोणते बदल होणार ?

यानंतर संबंधित रुग्णाच्या मुलीला झिकाची सौम्य लक्षणे दिसून आली. तिचा रक्त नमुना २१ जूनला राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्यात तिला संसर्ग झाल्याचेही निष्पन्न झाले. या दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत. या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे. अद्याप संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये झिकाची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत.

झिका हा रोग एडीस इजिप्ती डासामुळे होतो. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्ण आढळलेल्या परिसरात औषध फवारणी सुरू केली आहे. त्याचबरोबर डासोत्पत्ती ठिकाणे शोधून ती नष्ट केली जात आहेत. तसेच, परिसरातील घरांमध्ये सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यात तापाचे रुग्ण आढळल्यास त्यांना प्रथमोपचार देऊन त्यांच्या रक्ताचे नमुने संकलित केले जात आहेत.

हेही वाचा >>>ड्रग्स व्हायरल प्रकरण : फर्ग्युसन रोडवरील अनधिकृत हॉटेलवर पुणे पोलिस आणि महापालिका प्रशासनाची कारवाई

काय काळजी घ्यावी…

– घराभोवती पाणी साचून त्यात डासोत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्या.

– शरीर संपूर्ण झाकले जाईल असे कपडे घालावेत.

– दिवसाही डास प्रतिरोधक औषधांचा वापर करावा.

– झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.

– गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने विशेष काळजी घ्यावी.

शहरात आढळून आलेल्या झिकाच्या दोन्ही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून आली असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली जात आहे. याचबरोबर महापालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.- कल्पना बळीवंत, प्रभारी आरोग्य प्रमुख, महापालिका