पुणेकरांनो सावधान… शहरामध्ये ‘टायर पंक्चर रॅकेट’चा भांडाफोड; समोर आली धक्कादायक माहिती!

पुणे पोलिसांनी टायर पंक्चरच्या नावाने चालणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे,.

tyre puncture racket in pune
पुण्यात टायर पंक्चर रॅकेटचा पर्दाफाश!

लोकांना फसवण्यासाठी भामट्यांकडून वेगवेगळ्या प्रकारची शक्कल लढवली जात असते. आणि नवनव्या पद्धतीमुळे लोक देखील त्या जाळ्यात अडकून आपलं आर्थिक नुकसान करवून घेत असतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांकडून सातत्याने केलं जातं. पुण्यामध्ये देखील असाच एक फसवणुकीचा प्रकार समोर आला असून इथे चक्क टायर पंक्चर रॅकेट अगदी बिनबोभाटपणे सुरू असल्याचं पोलिसांना तपासात आढळलं आहे. त्यामुळे पुणेकरांसोबतच सर्वांनाच आश्चर्याचा भितीयुक्त धक्का बसला असून पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

गेल्या ३ वर्षांपासून पुण्याच्या खडकी परिसरामध्ये हा सगळा कारभार सुरू होता. टायर पंक्चर काढण्याच्या निमित्ताने लोकांना हजारो रुपयांना फसवण्याचा धंदा या टोळक्यानं सुरू केला होता. काही सजग ग्राहकांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी यांदर्भात तातडीने लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं आहे. हिंदुस्तान टाईम्सनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

काय आहे या टोळक्याची मोडस ऑपरेंडी?

या टोळक्याचे सहकारी सर्वात आधी कारचालक किंवा बाईकस्वाराला त्याच्या चाकामध्ये हवा कमी असल्याचं सांगतात. त्यानंतर पंक्चर असू शकतं, अशी शक्यता सांगून संबंधित आरोपींच्या पंक्चरच्या दुकानाचा पत्ता सांगतात. तिथे पंक्चर काढून मिळेल, असं सांगून काही मिनिटांत दिसेनासे देखील होतात. यानंतर जेव्हा संबंधित कारचालक किंवा बाईकस्वार त्या दुकानात जातो, तेव्हा त्याच्या गाडीच्या टायरमध्ये बरेच पंक्चर असल्याचं सांगितलं जातं. हे पंक्चर काढण्यासाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात. हजारो रुपये लाटले जातात.

कसा उघड झाला सगळा कारभार?

गेल्या शनिवारी संदीप शिंदे नावाच्या एका व्यक्तीने खडकी पोलीस स्थानकात आपली फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. टायर पंक्चरच्या नावाखाली संदीपकडून ३ हजार रुपये लाटल्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी ५० वर्षीय फ्रान्सिस सनी अमोलिक आणि त्याचा २८ वर्षीय सहकारी प्रशांत राजू वाघमारे या दोघांना अटक केली आहे. संदीपच्या बाईकच्या टायरमध्ये २६ पंक्चर असल्याचं सांगून ही लूट करण्यात आली होती. यानंतर संदीपने पोलिसांत तक्रार दाखल केली आणि हा सगळा प्रकार समोर आला.

खडकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधीही अशा घटना घडल्या आहेत. १२ ऑक्टोबर २०१७ रोजी गायनॅकोलॉजिस्ट डॉ. मीनाक्षी येलवांटगे आणि त्यांचे पती सोमनाथ नांदेड सिटीमध्ये जात असताना त्यांनाही अशाच प्रकारे ३ हजार २०० रुपयांचा चुना लावण्यात आला होता. त्यांना टायरमध्ये ३२ पंक्चर असल्याचं सांगितलं गेलं. २२ सप्टेंबर रोजी चिराग निंबरे नावाच्या तरुणालाही त्याच्या बाईकच्या टायरमध्ये ६० पंक्चर असल्याचं सांगून तब्बल ६ हजार ५०० रुपयांना लुटण्यात आलं होतं. मार्च २०१८ मध्ये अजय महाजन नावाच्या व्यक्तीने अशाच प्रकारच्या लुटीचा व्हिडीओ काढून त्यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.

या प्रकारासंदर्भात नागरीक संघटनांनी आक्षेप नोंदवला असून शहरातील पंक्चर काढणाऱ्या दुकानदारांना नोंदणी बंधनकारक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tyre puncture racket in pune people looted for thousands police arrested accused pmw

ताज्या बातम्या