पुणे : कोरेगाव भीमा चौकशी आयोगाच्या सुनावणीस राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मंगळवारीही अनुपस्थित राहिले. त्यामुळे ठाकरे यांना वाॅरंट बजाविण्यात यावे, असा अर्ज वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वतीने त्यांच्या वकिलाने आयोगाला दिला आहे. या अर्जावर आज, (३ डिसेंबर) सुनावणी होणार आहे.
आंबडेकर यांनी दाखल केलेल्या अर्जासंदर्भात उद्धव ठाकरे यांना नोटीस बजाविण्यात आली होती. त्यानुसार मंगळवारी आयोगासमोर समक्ष किंवा प्रतिनिधी उपस्थित राहण्याचे आदेश आयोगाने ठाकरे यांना दिले होते. मात्र, ठाकरे हे मंगळवारीही अनुपस्थित राहिले.
मागील सुनावणीत उद्धव ठाकरे हे अनुपस्थित राहिल्याने त्यांच्याविरोधात वाॅरंट जारी करण्याची मागणी आंबडेकर यांच्या वतीने ॲड. किरण कदम यांनी केली होती. त्यानुसार आयोगाने उद्धव ठाकरे यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविली. मात्र, मंगळवारी ठाकरे हे स्वत: किंवा त्यांचा प्रतिनिधी सुनावणीसाठी आयोगापुढे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांना वाॅरंट बजाविण्यात यावे, असा अर्ज ॲड. कदम यांनी आयोगाला दिला.
आंबेडकर यांनी फेब्रुवारी महिन्यात आयोगाला अर्ज केला होता. त्यामध्ये ‘ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी २४ जानेवारी २०२० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र दिले होते. त्यानुसार १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे झालेला हिंसाचाराचा कट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने रचला होता,’ असे या पत्रात नमूद करण्यात आल्याचे आंबेडकर यांनी अर्जात नमूद केले आहे.
शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्राची प्रत संबंधित कागदपत्रांसह आयोगाला सादर करावी, अशी विनंती आंबेडकर यांनी आयोगाकडे केली आहे. ऑगस्ट महिन्यात शरद पवार यांनी त्यांच्या वकिलामार्फत पत्राची प्रत नसल्याचे कळविले. त्यानंतर आंबेडकर यांच्या वतीने त्यांचे वकील कदम यांनी आयोगाकडे अर्ज केला. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांना पत्र आणि संबंधित कागदपत्रे सादर करण्याची नोटीस बजाविण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार आयोगाने ठाकरे यांना दोन वेळा नोटीस बजावित कागदपत्रे वैयक्तिक स्वरूपात किंवा त्यांच्या वकिलामार्फत सादर करण्यास सांगितले.
