पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोथरूडमधील शिवसेनेचे ( ठाकरे) माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि येरवड्याचे माजी नगरसेवक संजय भोसले यांनी पत्नी अश्विनी भोसले यांच्यासहभारतीय जनता पक्षात मंगळवारी प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे कोथरूडमधील राजकीय समीकरणे बदलणार असून भाजपच्या काही निष्ठावंताकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपनगरांवर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार हडपसर‚ वडगावशेरी आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातील अन्य पक्षांतील माजी नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश देेण्यात आले आहेत. त्यानंतर कोथरूडमधील शिवसेनेलाही ( ठाकरे) भाजपने खिंडार पाडले आहे. शिवसेनेचे कोथरूडचे माजी नगरसेवक ‚ गटनेते पृथ्वीराज सुतार तसेच येरवड्यातील माजी नगरसेवक संजय भोसले यांनी भाजपमध्ये मंगळवारी प्रवेश केला.
केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ ‚ राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी‚ शहराध्यक्ष धीरज घाटे‚ महापालिका निवडणूक प्रमुख गणेश बीडकर आणि माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या उपस्थितीमध्ये हे दोन्ही प्रवेश शहर भाजप कार्यालयात झाले.
कोथरूड भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. भाजप नगरसेवकांचे प्राबल्य असूनही सुतार यांना पक्षात प्रवेश दिल्याने येथील राजकीय गणितेही बदलणार आहेत. सुतार यांना प्रवेश दिल्याने भाजपमधील इच्छुकांसह निष्ठावंतामध्ये कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे. त्याचे पडसादही उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शिवसेनेबरोबर यापूर्वी काम केले आहे. दोन्ही पक्षात हिंदुुत्वाचा धागा कायम आहे‚ असे धीरज घाटे यांनी यावेळी सांगितले.
हे दोन्ही नेते गेली अनेक वर्ष पुण्याच्या सामाजिक जीवनात काम करणारे आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजपची युती झाली तेव्हा पासून हे नेते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काम करत होते. यापुढेही हिंदुत्वाच्या मुद्यावर जर काम करायचे असेल तर‚ भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष आहे याची जाणीव झाल्यानेच त्यांनी पक्षात येण्याचा निर्णय घेतला. त्याला भाजप नेत्यांनी पाठिंबा दिला.
या दोन्ही नेत्यांनी आपापल्या प्रभागात उत्तम काम केले आहे‚ अशी भूमिका मोहोळ यांनी मांडली. भाजप सर्वात मोठी जनसंघटना आहे. पक्ष विस्तारा बरोबरच पक्ष बांधणी मजबूत करण्यासाठी प्रवेश दिले जात आहेत. प्रवेश दिला म्हणजे उमेदवारी मिळेल असे नाही. येत्या काळात सर्व चित्र स्पष्ट होईल. – मुरलीधर मोहोळ ‚ केंद्रीय सहकार राज्यमंत्री
