मुंबईतील गोरेगाव येथे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची युती तोडल्याची घोषणा केली. मुंबई महापालिकेसह राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढेल, असे ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांसह शिवसैनिकांनी जल्लोष केला. युती तुटल्याची घोषणा मुंबईत झाली असली, तरी आनंदी शिवसैनिकांनी पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युती तुटल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील शिवसैनिकांनी त्याचा आनंद साजरा केला. शिवसैनिक एकमेकांना पेढे भरवत होते. ढोलताशांचा आवाज शहरात घुमत होता. महिला कार्यकर्त्यांनी फुगड्या खेळून आनंद साजरा केला. पिंपरी-चिंचवडमधील शिवसैनिकांनी आकुर्डी येथील शिवसेना भवन येथे फटाके फोडले. युती तुटल्याचा आनंद शिवसैनिकांच्या चेहऱ्यावर झळकत होता. शिवसेना भवन येथे इच्छुक उमेदवारांसह शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवसेनेची भूमिका स्पष्ट मांडली. यापुढे भाजपच्या दारात युतीसाठी जाणार नाही, असे ठाकरे यांनी जाहीर केले. त्यामुळे राज्यात होऊ घातलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेनेची युती होणार नाही, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसाठी सुरू असलेले चर्चेचे गुऱ्हाळ आता थांबले आहे. युतीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे, अशा प्रतिक्रिया पदाधिकारी आणि शिवसैनिक व्यक्त करत होते.

भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका स्वतंत्र लढणार आहेत. शिवसेना आणि भाजपमध्ये युतीसाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या होत्या. मात्र, आता युती तुटल्याची घोषणा झाल्यानंतर या फेऱ्याही बंद झाल्या आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान देण्यासाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात युती होईल, अशी शक्यता होती. पण उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर ही शक्यताही मावळली आहे. शिवसेना आणि भाजप हे दोघेही पक्ष निवडणुकांमध्ये ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत दिसणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी राष्ट्रवादीसह भाजप आणि शिवसेनाही संपूर्ण ताकद पणाला लावणार आहेत, हे निश्चित आहे. मात्र, येथील जनता कुणाच्या बाजूने कौल देते, हे येणारा काळच ठरवेल.

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray announce break up tie with bjp shivsena in mumbai celebration in pimpri chinchwad by shivsenas activist
First published on: 27-01-2017 at 15:49 IST